1. बातम्या

कृषी, आदिवासी आणि ग्रामीण क्षेत्रातील शाश्वत विकासासाठी नवीन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करण्याची गरज

पुणे: शहरांचा झपाट्याने विकास होत असताना आणि शहरांवरील ताण वाढत असताना या विकासाचे विकेंद्रीकरण आणि कृषी, आदिवासी व ग्रामीण विकासावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

KJ Staff
KJ Staff


पुणे: शहरांचा झपाट्याने विकास होत असताना आणि शहरांवरील ताण वाढत असताना या विकासाचे विकेंद्रीकरण आणि कृषी, आदिवासी व ग्रामीण विकासावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड अ‍ॅग्रीकल्चर (एमसीसीआयए) तर्फे व डॉईश गेझेल शाफ्ट फ्युअर इंटरनॅशनल झुजामेनार बाईट (जीआयझेड) जीएमबीएच व भारत सरकारच्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने एकदिवसीय अभिनव परिषद अर्थात इनोव्हेशन कॉन्क्लेव्हचे आयोजन हयात पुणे येथे करण्यात आले होते. ही परिषदेची दुसरी आवृत्ती होती त्यावेळी उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, डिजिटल टेक्नोलॉजिज, बिल्डिंग अ‍ॅन्ड इनक्लुझिव्ह इकोसिस्टिम इन इंडिया अ‍ॅन्ड ट्रान्सफर्मेटिव्ह मोबिलिटी-द रोड अहेड या चार सत्रांचा या परिषदेत समावेश होता.

नितीन गडकरी पुढे म्हणाले की, कृषी, आदिवासी व ग्रामविकास क्षेत्रात शाश्‍वत विकासासाठी नवीन तंत्रज्ञान व अभिनवतेची गरज आहे. याचबरोबर शहरातील औद्योगिक विकास विकेंद्रित करून अवतीभोवती सॅटेलाईट सेंटर्सची देखील गरज आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड अ‍ॅग्रीकल्चर सारख्या संस्था यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. गडकरी यांनी आपल्या भाषणात सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगाच्या विकासाला चालना देण्यासाठी घेण्यात येत असलेल्या विविध पुढाकारांबाबत तसेच दळणवळण (लॉजिस्टिक्स), उर्जा आणि भांडवली खर्च कमी करण्याच्या दिशेने उचलत असलेल्या पावलांबद्दल माहिती दिली.

आरजीएसटीसीचे अध्यक्ष डॉ.अनिल काकोडकर म्हणाले की,ग्रामीण क्षेत्रात आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी मोठी संधी आहे, मात्र त्यासाठी ग्रामीण युवकांमध्ये क्षमता वाढीवर लक्ष्य केंद्रित करण्याची गरज आहे. कृषी, उत्पादन आणि सेवा हे अर्थव्यवस्थेचे तीनही पैलू ग्रामीण क्षेत्रात मोठी प्रगती करू शकतात आणि त्यामध्ये ज्ञानावर आधारित तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

भारत सरकारच्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव राम मोहन मिश्रा म्हणाले की, या परिषदेची संकल्पना ही योग्य आहे,कारण सध्याच्या काळात अभिनवता हा पर्याय नसून गरज आहे. उपलब्ध संधींचा पूरेपूर वापर व्हावा यासाठी विविध व्यवसायांचे जाळे विकसित करण्याची गरज आहे.

जीआयझेड इंडियाच्या प्रायव्हेट सेक्टर विभागाचे संचालक नूर नक्सबांदी म्हणाले की, अभिनवता म्हणजे फक्त काहीतरी नवीन करणे नव्हे तर त्याचा एक हेतू असला पाहिजे आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम याकडे देखील आपण लक्ष दिले पाहिजे.या अभिनवतेद्वारे हवामान बदलासारख्या सध्याच्या सर्वांत मोठ्या आव्हानांवर उपाययोजना करणे गरजेचे आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड अ‍ॅग्रीकल्चरचे अध्यक्ष प्रदीप भार्गवा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर सरसंचालक प्रशांत गिरबाने यांनी आभार मानले.

English Summary: Need to focus on new technologies and innovations for sustainable development in agriculture, tribal and rural sectors Published on: 16 November 2019, 08:07 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters