मुंबई: आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यासाठी पौष्टिक तृणधान्य आवश्यक आहे. राज्यातील जनतेस तसेच आदिवासी भागातील लोकांना पौष्टिक आहार अधिकाधिक उपलब्ध व्हावा, यादृष्टीने त्याचे उत्पन्न वाढविण्याची गरज असल्याचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी येथे सांगितले.
पौष्टिक तृणधान्याबाबतची आढावा बैठक राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपालांचे सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, आदिवासी विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगरु व्ही. एम. भाले, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगरु ए. एस. ढवन आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगरु के. पी. विश्वनाथन, इंडियन स्कुल ऑफ बिजनेस हैद्राबादचे प्रा. अश्विनी आदी उपस्थित होते.
यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव म्हणाले, राज्यात पौष्टिक तृणधान्य पिकाचे क्षेत्र, विस्तार, उत्पादन, वृद्धी, पिकाचे पौष्टिक मूल्य शेतकऱ्यापर्यंत पोहचविणे,नवीन वाणांची शेतकऱ्यांना माहिती व्हावी, याकरिता प्रचार व प्रसार करुन त्याचे लागवड क्षेत्र वाढविणे आवश्यक आहे. यासाठी कृषी विद्यापीठे, कृषी विभाग व संबंधित इतर विभागांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आरोग्याबाबतच्या जनजागृतीमूळे ज्वारी, बाजरी व नाचणी या तृणधान्याला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. या पौष्टिक तृणधान्यामुळे आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे. यासाठी भविष्यात पौष्टिक तृणधान्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होऊन उत्पन्न वाढणे आवश्यक आहे. यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.
Share your comments