मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात 21 दिवसांचे लॉकडाऊन सुरू झाले असून या काळात नागरिकांना भाजीपालासह इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी शासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहे. मुंबई शहराला सुरळीतपणे भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्यासाठी मुंबईतील दादर आणि भायखळा मार्केट सुरू करण्यात आले असून वाशी येथील नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगन भुजबळ यांनी दिली आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत मुंबई शहरासह राज्यभर भाजीपाला, अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्य शासनाकडून उपाययोजना केल्या जात असून आज मुंबईतील दादर व भायखळा भाजी मार्केट सुरू करण्यात आले आहे. तसेच उद्यापासून नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व कामकाज नियमित करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई शहर व परिसरातील नागरिकांना नियमित भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होणार आहे. भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या मालवाहतूक गाड्यांना अडवू नये.
शासनाच्या वतीने भाजीपाला, अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी नियोजन करण्यात येत असून भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या मालवाहतूक गाड्यांना पोलिसांनी अडवू नये त्यांना मार्गस्थ करण्यात यावे असे आदेश श्री. भुजबळ यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत. याबाबत त्यांनी मुंबई व नाशिक पोलीस आयुक्तांशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून माल घेऊन जाणारी आणि त्यानंतर परतणारी रिकामे वाहने पोलिसांनी तात्काळ सोडावी असे आदेश दिले आहेत. शेतकरी व भाजीपाला विक्रेते आणि अन्नधान्य व्यापाऱ्यांनी नागरिकांना जीवनावश्यक माल नियमित उपलब्ध करून द्यावा असे आवाहन श्री. भुजबळ यांनी केले आहे.
Share your comments