देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून या विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. या विषाणूविरुद्धाच्या लढाईत समाजातील सर्व घटक एकमेंकांना साथ देत आहेत. मोठ्या उद्योगपतींपासून ते सामान्य घरातील व्यक्तीपर्यंत सर्वजण महाराष्ट्र सरकारला आणि पीएम केअर फंडाला सहायता निधी आर्थिक मदत करत आहेत. खेळ जगतापासून ते मनोरंजन जगतापर्यंतच्या सगळ्यांनी निधी दिला आहे.
यासह अनेक देवस्थान मंडळांनी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत केली आहे. साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने या संकटाचा सामना करण्यासाठी ५१ कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधी दिला. तर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून दोन कोटींची मदत जाहीर करण्यात आली. शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्ट कडून बारा लाखाचं व्हेंटिलेटर, जेजुरी मार्तंड देवस्थान कडून ५१ लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधी आर्थिक मदत म्हणून देण्यात आले.
आता काही शिक्षण संस्थाही पीएम केअर आणि मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करत आहेत. नाशिक मधील के. के. वाघ शिक्षणसंस्था आणि कर्मचाऱ्यांनी कोरोना विरुद्धच्या लढाईत आपला सहभाग नोंदवला आहे. देशासमोर आलेल्या अशा बिकट संकटाचा सामना करण्यासाठी के. के. वाघ शिक्षण संस्था आणि तेथील कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधी व पीएम केअ फंडला अनुक्रमे १५ आणि १० अशी एकूण २५ लाखांची मदत केली आहे. याविषयी माहिती संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी दिली. दरम्यान संस्थेचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. आजपर्यंत ५० हजारांहून अधिक माजी विदार्थी देशासह परदेशात विविध पदावर कार्यरत आहेत. या सर्व माजी विद्यार्थ्याींनी सामाजिक बांधिलकी म्हणून शासनाला सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी केले. दरम्यान शिक्षण संस्थेअंतर्गत अभियांत्रिक महाविद्यालय, तंत्रनिकेतन, फार्मसी, सहाही कृषी महाविद्यालयांत सर्व विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन माध्यामतून प्राध्यापक व शिक्षकवर्ग तासिका घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत.
Share your comments