1. बातम्या

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे नांदेड-44 बीटी (बीजी-2) वाणाचे लोकार्पण

KJ Staff
KJ Staff


परभणी:
वनामकृविचा लोकप्रिय कपाशीचा संकरीत वाण नांदेड-44 हा देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बीटी स्‍वरूपातील पहिला वाण ठरला असल्‍याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादीत (महाबीज), अकोला यांच्‍या संयुक्‍त विद्यामाने दिनांक 15 जुन रोजी नांदेड-44 बीटी (बीजी-2) वाणाचा लोकार्पण सोहळा संपन्‍न झाला.

कुलगुरू डॉ. अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, अनेक दिवसापासुन कपाशीच्‍या नांदेड-44 बीटी वाणाची शेतकरी मोठया आतुरतेने वाट पाहात होते, त्‍याचे बियाणे शेतकऱ्यांच्या हाती देतांना विद्यापीठास मोठे समाधान वाटत आहे, ही विद्यापीठ संशोधनातील ऐतिहासिक बाब आहे. यावर्षी या बियाणांची तेविस हजार पॅकेट महाबीजकडुन मराठवाडयाकरिता उपलब्‍ध झाली आहेत. येणाऱ्या काळात नांदेड-44 बीटी बीजोत्‍पादनासाठी मराठवाडयातील शेतकऱ्यांनी पुढाकार घ्‍यावा, यासाठी लागणारे तांत्रिक पाठबळ विद्यापीठ पुरवील. अनेक वर्ष शेतकऱ्यांच्या मनात अधिराज्‍य गाजलेले नांदेड-44 हे वाण बीटी तंत्रज्ञानाच्‍या युगात लोप पावला होता. परंतु नांदेड-44 हे वाण बीटी स्‍वरूपात उपलब्‍ध झाल्‍याने त्‍यास पुर्नवैभव प्राप्‍त होईल. या वाणाच्‍या बियाणास शेतकऱ्यांची आजही मोठी मागणी आहे, त्‍यामुळे महाबीजला बियाणाची जाहिरात करण्‍याची गरज नाही.

बचत होणाऱ्या जाहिरातीवरील खर्चमधुन बियाण्‍याचे दर कमी केल्‍यास शेतकऱ्यांना त्‍यांचा फायदा होईल. शेतकऱ्यांनी या वाणाची लागवड करतांना एकात्मिक किड व्‍यवस्‍थापन तंत्रज्ञानाची जोड दयावी, त्‍यामुळे कमी खर्चात किड नियंत्रण होईल. विद्यापीठ येवढयावरच थांबलेले नसुन लवकरच विद्यापीठ विकसित एनएचएच-715 व एनएचएच-250 हे चांगले उत्‍पादन देणारे कापसाचे वाण बीटी मध्‍ये परावर्तीत करण्‍यासाठी महाबीज सोबत करार करण्‍यात येणार आहे. येणाऱ्या 3 ते 4 वर्षात ही वाणेही शेतकऱ्यांना उपलब्‍ध होऊन कापुस बियाणे बाजारातील 40 टक्के हिस्‍सा या वाणाचा असेल अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, नांदेड-44 वाण बीटी मध्‍ये परावर्तीत करण्‍यासाठी मार्च 2014 मध्‍ये परभणी कृषी विद्यापीठ व महाबीज यांच्‍यात करार झाला. महा‍बीजचे तत्‍कालीन व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ. शालीग्राम वाणखेडे, माजी कुलगुरू डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु व सध्‍याचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्‍या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व महा‍बीजचे अधिकारी यांच्‍या अथक परिश्रमामुळे पाच वर्षात नांदेड-44 बीटी मध्‍ये परावर्तीत करण्‍यात आला. हा दिवस विद्यापीठ संशोधनातील सुवर्ण दिवस ठरला. हा वाण पुर्नबहराची क्षमता असलेला, रसशोषण करणाऱ्या किडीस प्रतिकारकक्षम असलेल वाण असुन कोणत्‍याही परिस्थि‍तीत स्थिर उत्‍पादन देणार आहे. विद्यापीठ प्रक्षेत्रावर या वाणाने बागायती मध्‍ये हेक्‍टरी 38 क्विंटल तर कोरडवाहु मध्‍ये 23 क्विंटल उत्‍पादन दिले आहे.

श्री. सुरेश फुंडकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, यावर्षी मराठवाडया करिता तेविस हजार नांदेड-44 बीटी बियाण्‍याची पॅकिटे उपलब्‍ध करण्‍यात आली असुन पुढील वर्षी तीन लाख पॅकिटे उपलब्‍ध करण्‍याचे महाबीजचे उदिदष्‍ट आहे. या संकरित बीटी वाणातील नर व मोदी दोन्‍ही मध्‍ये बीटीचा अंतर्भाव करण्‍यात आल्‍यामुळे बीटी जीनचा प्रभाव इतर वाणाच्‍या तुलनेत जास्‍त दिसुन येईल. मराठवाडयात बीजोत्‍पादनाचे लक्ष असल्‍याचेही त्यांनी सांगितले. कापुस विषेशतज्ञ डॉ. खिजर बेग यांनी हा वाण पाण्‍याचा ताण सहन करणारा असुन शेतकऱ्यांना कापुस उत्‍पादनात स्‍थैर्यता देण्‍याची ताकत असल्‍याचे सांगितले.

यावेळी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते नांदेड-44 बीटी (बीजी-2) वाणाचे लोकार्पण करून निवडक शेतकऱ्यांना पॅकेटचे वाटप करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक सुरेश गायकवाड यांनी केले तर सुत्रसंचालन प्रा. अरविंद पडांगळे यांनी केले. कार्यक्रमास शेतकरी, विद्यापीठ व महाबीजचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.


Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters