परभणी कृषी विद्यापीठ विकसित कपाशीचा नांदेड-44 हा संकरित वाण बीटीमध्ये परावर्तीत झाला असुन कोरडवाहु कापुस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक ऐतिहासिक उपलब्धी आहे. हा वाण कापुस उत्पादकांच्या हृदयावर पुन्हा अधिराज्य गाजवेल, अशी अपेक्षा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादीत अकोला व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांचे संयुक्त विद्यमाने संकरीत कपाशी नांदेड-44 (एनएचएच-44) व पीकेव्ही हायब्रीड-2 बीटी वाणांचे पीक प्रात्यक्षिक पाहणी कार्यक्रम दिनांक 22 ऑक्टोबर रोजी परभणी येथील विद्यापीठ मध्यवर्ती प्रक्षेत्र-बलसा विभाग येथे पार पडला, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक श्री. ओमप्रकाश देशमुख, महाबीजचे संचालक श्री. वल्लभरावजी देशमुख, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, महाबीजचे महाव्यवस्थापक (उत्पादन) श्री. सुरेश पुंडकर, महाव्यवस्थापक (विपणन) श्री. रामचंद्र नाके, महाव्यवस्थापक (गुण नियंत्रण व संशोधन) डॉ. प्रफुल्ल लहाने, परभणी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. बी. आर. शिंदे, कापुस विशेषज्ञ डॉ. खिजर बेग, डॉ. विलास खराटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू डॉ. अशोक ढवण पुढे म्हणाले की, विद्यापीठाने कपाशीचा नांदेड-44 हा संकरित वाण 1984 मध्ये प्रसारीत केला, त्यांनतर वीस वर्ष राज्यातीलच नव्हे तर देशातील कापुस उत्पादकांमध्ये लागवडीसाठी प्रचलित होता. हवामान बदलच्या पार्श्वभुमीवर हा वाण चांगले उत्पादन देणारा वाण ठरेल. येणाऱ्या खरीप हंगामात नांदेड-44 वाणाचे महाबिज मार्फत मर्यादित स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध होणारे बियाणे निवडक प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतावर लागवडीसाठी उपलब्ध करावे, या वाणाचा तुलनात्मक अभ्यास इतर वाणाशी करून प्रत्येक बाबींची नोंद घ्यावी. या वाणाचे बियाणे मुबलक प्रमाणात बाजारात आल्यास कपाशीच्या बियाणेबाबत शेतकऱ्यांची होणारी फसवणुकीस आळा बसेल. कृषी विभाग, महाबीज व कृषी विद्यापीठ हे शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबध्द आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक श्री. ओमप्रकाश देशमुख आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, नांदेड-44 व पीकेव्ही हायब्रीड-2 या कपाशीच्या वाणांचे बीजी-2 मध्ये परावर्तनामुळे या वाणाचे पुर्नजीवन झाले आहे. नांदेड-44 हा कापसावरील रसशोषण करणा-या कीडींना कमी बळी पडणारा व गुलाबी बोंडअळीस सहनशील हा वाण आहे.यामुळे शेतक-यांचा कीडनाशक फवारणीवर होणारा मोठा खर्च कमी होईल व लागवड खर्च कमी होईल. सन 2022 पर्यंत कापुस उत्पादकांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे असलेले उदिष्टे साध्य करण्यास याची मदत होईल, असे मत व्यक्त करून शेतकऱ्यांनी महाबीजच्या बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर आपल्या मनोगतात म्हणाले की, नांदेड येथील कापुस संशोधन केंद्रातुन 1984 साली विकसित झालेला कपाशीचा नांदेड-४४ हा संकरित वाण कपाशीचे बीटी वाण येण्यापुर्वी अधिक उत्पादन देणारा, पुनर्बहाराची क्षमता असलेला व रसशोषण करणाऱ्या कीडींना प्रतिकारक असल्यामुळे राज्यातीलच नव्हे तर देशातील इतर राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठया प्रमाणावर लागवडीसाठी प्रचलित होता. हा वाण जनुकीय परावर्तनासाठी म्हणजेचे बीजी-2 मध्ये परावर्तीत करण्यासाठी मार्च 2014 मध्ये वनामकृवि व महाबीजमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. हा करार माजी कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलु, सद्याचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, महाबीजचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. शालीग्राम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. त्यानंतर या बीटी वाणाच्या गेल्या तीन वर्षापासुन सातत्याने प्रक्षेत्र चाचण्या यशस्वी झाल्या. त्याचा प्रात्यक्षिकाचा भाग म्हणुन सदरिल प्रात्यक्षिक पाहणी कार्यक्रमाचे आयोजण करण्यात आल्याचे सांगुन राज्यातील दोन सार्वजनिक संस्था महाबीज व कृषि विद्यापीठ एकत्रित कार्य केल्यामुळे आज कपाशी नांदेड-44 हे वाण बीटीत परावर्तीत करण्यात यश आले. नांदेड-44 मुळेच देशात परभणी कृषी विद्यापीठाची ओळख होती, अनेक दिवसापासुन शेतकऱ्यांमध्ये असलेली मागणी पुर्ण करू शकलो, असे मत व्यक्त केले.
यावेळी श्री. सुरेश पुंडकर, श्री. रामचंद्र नाके, डॉ. प्रफुल्ल लहाने, श्री. बी. आर. शिंदे, डॉ. खिजर बेग आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाबीज विभागीय व्यवस्थापक श्री. सुरेश गायकवाड यांनी केले तर महाबीज जिल्हा व्यवस्थापक श्री. गणेश चिरूटकर यांनी सुत्रसंचालन केले. सदरील पीक प्रात्यक्षिक पाहणी कार्यक्रमास परिसरातील शेतकरी, महाबीज व विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
Share your comments