नवी दिल्ली: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आज भारत देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्राचे सुपूत्र ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख व प्रख्यात गायक भूपेन हजारिका यांनाही मरणोत्तर हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्र शासनाने आज देशातील सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ पुरस्कारांची घोषणा केली. राष्ट्रपती महोदयांच्या स्वाक्षरीचे सन्मान पत्र आणि पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
हिंगोली जिल्ह्यातील कडोळी या गावी 11 ऑक्टोबर 1916 मध्ये नानाजी देशमुख यांचा जन्म झाला. नानाजी यांनी भारतीय संस्कृतीच्या आधारावर मनुष्याचा सर्वांगिण विकास होऊ शकतो या विचाला मध्यवर्ती ठेवून देशभर रचनात्मक व शाश्वत विकास साधणारे समाजकार्य केले. पांचजन्य, राष्ट्रधर्म आणि स्वदेश या नितकालिकांचे जबाबदारी त्यांनी सांभाळली. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतही नानाजी देशमुख सहभागी झाले.
देशातील शेतकऱ्यांना सिंचनाच्याबाबतीत स्वयंपूर्ण करण्यात त्याचे मोलाचे योगदान राहीले आहे. गोवंशसंवर्धन, पारंपरिक कृषी पध्दतीचा विकास व प्रसार, गुरुकुल पध्दतीने शालेय शिक्षण, उद्योजकता विद्यापीठाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराला प्राधान्य, आरोग्यधाम योजनेंतर्गत आयुर्वेदिक वनौषधींविषयी संशोधन आदी महत्त्वपूर्ण कार्य नानाजींनी केले.
Share your comments