येलो मोझॅक,बोंडअळी व पावसात खंड पडल्याने झालेल्या नुकसानीपोटी १००% नुकसान भरपाई मिळावी, सोयाबीन-कापसाला दरवाढ मिळावी, पिकविम्याची १००% फायनल रक्कम लवकर मिळावी, यासह अन्य मागण्यांसाठी गेल्या २ महिन्यांपासून रविकांत तुपकर वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत आहेत. आता या मागण्यांसाठी तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली १९ डिसेंबरला शेतकरी नागपूरच्या अधिवेशनावर करणार हल्लाबोल आंदोलन करणार आहेत.
सोयाबीन-कापूस दरवाढीसंदर्भात केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूषजी गोयल व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत रविकांत तुपकर यांची ९ डिसेंबर रोजी बैठक झाली. या बैठकीत सरकारने काही मागण्या मान्य केल्या होत्या.मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सरकारला १५ डिसेंबर पर्यंतची मुदत दिली होती. ती मुदत संपली पण सरकारने अद्याप आपल्या मागण्यांसंदर्भात अंमलबजावणीला सुरवात केली नसल्याने, पुन्हा एकदा रविकांत तुपकर आंदोलन करणार आहे.
यासंदर्भात सोमठाणा येथे शेतकऱ्यांची बैठक पार पडली, या बैठकीत सरकारने दिलेल्या शब्दाची आठवण करून देण्यासाठी नागपूर अधिवेशनावर हल्लाबोल आंदोलन करण्याचा निर्धार रविकांत तुपकर यांनी केला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांसोबत तुपकर १९ डिसेंबर रोजी अधिवेशनावर हल्लाबोल आंदोलन करणार आहेत. सोयाबीन-कापूस उत्पादकांचा इंगा काय असतो हे सरकारला १९ डिसेंबरला नागपूरात दाखवू, असा इशारा रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे.
Share your comments