खरीप हंगामात या वर्षी मोठे नुकसान झाले होते, हंगामात अवेळी आलेल्या पावसामुळे सर्वच पिकांवर विपरीत परिणाम घडून आला होता. अवकाळी पावसामुळे व अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील तुरीच्या पिकाला देखील मोठा फटका बसला होता आणि यामुळे तुरीच्या उत्पादनात घट झाल्याचे नमूद करण्यात येत आहे. असे असले तरी खुल्या बाजारात अद्याप पर्यंत तुरीला चांगला बाजारभाव मिळत नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
तुरी समवेतच खरीप हंगामात सोयाबीन पिकाचे देखील मोठे नुकसान झाले होते, आतापर्यंत सोयाबीनला समाधानकारक बाजार भाव प्राप्त होत होता मात्र हंगामाच्या अंतिम टप्प्यात सोयाबीनचा बाजार भावात उतरती कळा बघायला मिळत आहे. सध्या बाजारपेठेत सोयाबीन सहा हजार रुपये प्रति क्विंटल या दराने विक्री होत आहे तर बियाण्यासाठी उपयुक्त असलेला सोयाबीन सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत अजूनही विकला जात आहे. त्यामुळे जानेवारी महिना अखेरपर्यंत सोयाबीनच्या बाजार भावात उतरती कळा नमूद करण्यात आली असून बाजारपेठ आता मंदावले आहे. कृषी तज्ञांच्या मते, सोयाबीनचे बाजार भाव अजूनही खाली जाण्याची शक्यता आहे तर तुरीचे बाजार भाव जर नाफेड ने वेळीच खरेदी सुरू केली तर वाढण्याची शक्यता आहे. नववर्षाच्या सुरुवातीला तुरीचा हंगाम राज्यात सुरू झाला, या हंगामात नवीन तूर बाजारात विक्रीसाठी उशिरा आली मात्र तुरीला अद्यापही अपेक्षित बाजार भाव मिळत नाहीये.
शनिवारी म्हणजे जानेवारी अखेर तुरीच्या बाजार भावात अगदी अत्यल्प बढत नमूद करण्यात आले आहे, या दिवशी अमरावती बाजार समितीत तुरीला जास्तीत जास्त सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळाला. शासनाने तुरीसाठी सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव ठेवलेला आहे. महाराष्ट्र शासनाने नाफेड खरेदी केंद्र सुरू केल्यानंतर शेतकऱ्यांनी यामध्ये नोंदणी केली. मात्र सोयाबीन मूग उडीद या पिकाला खुल्या बाजारपेठेत चांगला बाजार भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेड मध्ये नोंदणीच केली नाही आणि सोयाबीन मूग उडीद विक्रीसाठी नाफेड चे दरवाजे गाठले देखील नाही. मात्र तूर उत्पादक शेतकऱ्यांना खुल्या बाजारपेठेत अद्यापही चांगला बाजारभाव मिळत नसल्याने, नाफेडची खरेदी सुरू झाले असल्याने भाव वाढण्याची आशा आहे.
दरवर्षी तूर उत्पादक शेतकऱ्यांना नाफेडने खरेदी सुरू केल्यानंतर भाव वाढण्याचा प्रत्यय आला असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अमरावती जिल्ह्यात देखील नाफेडचे अकरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र गेल्या आठवडाभरापासून तुरीचे बाजार भाव सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलच्या वर गेले नसल्याने खरेदीदारांनी तुरीचे बाजार भाव एवढे वाढणार नसल्याचे संकेत दिले आहेत. असे असले तरी तूर उत्पादक शेतकऱ्यांना तुरीचे बाजार भाव वाढण्याची आशा आहे.
Share your comments