कांद्याची केलेली आयात आणि कांदा व्यापाऱ्यांना घालून दिलेली साठवणुकीचे मर्यादा या सगळ्यांचा परिणाम गेल्या काही आठवड्यांपासून कांदा दर कमी होण्यावर झाला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सरकारने घेतलेल्या ग्राहक हिताच्या निर्णयांमुळे शेतकऱ्यांना ते नुकसानकारक ठरत आहे. त्यामुळे कांदा उत्पादकामध्ये सरकारविरोधी प्रचंड संतापाची लाट आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे कांदा उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे त्यामुळे नाफेडने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक जिल्हा मधूनच कांदा ५ हजार रुपये क्विंटल या दराने खरेदी करावा व कांदा उत्पादकांचे होणारे नुकसान थांबवावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने केली आहे.
आताच्या प्रसंगी दिवाळीचा सण तोंडावर आल्याने कांदा उत्पादक शेतकरी कांदा हा बाजार समितीत विकण्यासाठी आणत आहेत. परंतु गेल्या आठवड्यापासून बाजारभावात सतत घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्यांचा प्रचंड हिरमोड झालेला आहे. त्यामुळे संघटनेच्या या मागणीकडे केंद्र सरकारने लक्ष द्यावे व या मागणीचा विचार करावा, अशी मागणी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
याबाबत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी नाफेडची परदेशातून कांदा आयात करण्याऐवजी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करावा व तसे करण्यास केंद्राला भाग पाडावे व वरील गोष्टीचा पाठपुरावा करावा याबाबत नाफेड कार्यालयाकडे मागणी करणार आहेत.
Share your comments