मंडळी जगभरामध्ये कोरोना ने हाहाकार माजवला.जगाच्या पाठीवर अगदी क्वचितच एखाद्या ठिकाणी राहिला असेल जिथे अद्याप कोरोना व्हायरस पोचला नाही. कदाचित तो लवकर काळजी घेतली नाही तर तेथपर्यंत ही पोहोचेल.
एका बाजूला दर शंभर वर्षांनी अशा पद्धतीने जगभरामध्ये वेगवेगळ्या लाटा आल्या चा इतिहास पाठीमागील चारशे वर्षे दिसतोय, तर दुसर्या बाजूला आ बैल मुझे मार या पद्धतीने सामोरे जायची स्पर्धाच जणू मनुष्य जातीमध्ये लागलेली दिसत आहे. पाठीमागील काही वर्षांमध्ये निसर्गाचा समतोल प्रचंड ढासळत असल्याचा आपल्या सर्वांना दिसतोय. अनेक ठिकाणी हिमस्खलन, वादळांची वाढलेली संख्या, पावसाची बिघडलेली गणित, ऋतू चक्र मध्ये झालेले बदल हे काही नैसर्गिक पद्धतीने झालेले नाहीत. कुठेतरी याच्या मुळाशी या सर्व बदलामागे जो मेंदू आहे तो या पृथ्वीवरील सर्वात शहाणा सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणून याची गणना होते अशा माणसाचा आहे.
निसर्ग व्यवस्था उध्वस्त करण्यामागे शंभर टक्के योगदान हे मनुष्यजातीचे आहे हे कधीच नाकारता येणार नाही. प्रचंड प्रमाणात केलेली वृक्षतोड, नैसर्गिक जलस्रोतांची हव्या त्या पद्धतीने लावलेली विल्हेवाट, भूगर्भातील पाण्याचा अमर्यादित वापर, जमिनीवरील अन्न निर्मिती करणाऱ्या पहिल्या थराशी केलेली छेडछाड ,मनुष्यजात जगवली पाहिजे याच्या नावाखाली प्रचंड प्रमाणात हायब्रीड उत्पादन आणि पैसा हेच अंतिम सत्य आहे हे मानून प्रचंड पैसा कमवण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असणारा एक समाजघटक अशा या विचित्र अवस्थेमध्ये आजच्या तारखेला समाज येऊन थांबला आहे. अनेक बातम्या अस्वस्थ करून सोडत आहेत. अनेक ठिकाणी प्रेतांचा खच पडलेला आहे.अनेक ठिकाणी पेशंट ठेवण्यासाठी जागा अपुरी, अनेक देशांमध्ये आरोग्य सुविधांचा अभाव अशा एका विचित्र जगात आम्ही सध्या रहिवासी म्हणून राहत आहोत.
यातून बाहेर पडायचे अपेक्षा ठेवायची तर कुणाकडून? निसर्गाने परिस्थिती नियंत्रणात आणून द्यावी का आणि ते आता शक्य आहे का? नक्षत्रांच्या तारखांवरती येणारा पाऊस आता परत त्याच तारखांवर येऊ शकणार आहे का? दुर्दैवाने याचे उत्तर नाही असेच आहे. पृथ्वीची अवस्था म्हणजे पाहुण्यांना घरी बोलवावे आणि पाहुण्यांच्या मुलांनी घरातील सगळ्या सामानाची मोडतोड करावी अशी झाली आहे. आम्ही जीवसृष्टीचा एक छोटा हिस्सा आहोत आणि वसुधैव कुटुम्बकम या पद्धतीने सोबत असणाऱ्या सजीव व निर्जीव सृष्टी सोबत आमचा समन्वय उत्तम राहिला तरच मनुष्यजात सुरक्षित राहू शकते याचे भान समाज भान म्हणून सर्वांना आले तरच आपण इथे टिकू शकणार आहोत. अन्यथा पाहुण्या म्हणून आलेल्या या मनुष्यजातीला निसर्ग कशाही पद्धतीने नष्ट करू शकतो याचे भान आपण सर्वांनाच यायला हवे. सध्या केवळ काही ग्रॅम विषाणूंनी अख्खे जग वेठीस धरले आहे याची जाणीव सर्वांना व्हायला हवी. आम्ही निसर्गासोबत किती छेडछाड करणार आहोत. याबद्दल व्यापक जागृती होणे काळाची गरज आहे.
युद्धासाठी अब्जावधी रुपयांचे बजेट असणारे देश आज भिकाऱ्यासारखे लस साठी दुसऱ्या देशांकडे पाहत आहेत. यातच आम्ही आमची कशी वाट लावून घेतली आहे हे दिसून येते. जनतेचे आरोग्य हा गाभा केंद्रस्थानी ठेवल्यानंतर निसर्ग, पर्यावरण हे नैसर्गिकपणे हेच आपल्या सर्वांच्या विकासाचे केंद्र बनतील आणि हीच मनुष्यजातीला वाचू शकतील. याचे भान आता प्रत्येकाला यावेच लागेल. अन्यथा पाहुणा आलेला माणूस पाहुणा म्हणूनच या पृथ्वीवरून नष्ट होऊन जाईल. पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान असणारा हा प्राणी भविष्यामध्ये स्वतःचा विनाश कसा केला यावर दुसऱ्या ग्रहांवरील जीवसृष्टी घेऊन अभ्यास करत बसेल.
हे होऊ न द्यायच असेल तर गरज आहे आता प्रत्येकाने निसर्गाला समजून घेण्याची. आमच्या गरजांना समजून घेऊन निसर्गाशी समन्वय साधून आम्ही निसर्ग संगोपन करत मनुष्यजातीला पुढे घेऊन कसे जाऊ हे ठरवण्याची!
कोरोना काळामध्ये केवळ मास्क, सुरक्षित अंतर आणि लस यावरच मनुष्यजातीचे संरक्षण खात्रीलायक होऊ शकणार नाही हे समजून घेऊन मनुष्यजात लाखो वर्षे या पृथ्वीतलावर टिकून राहू शकेल या पद्धतीने सभोवतालच्या पर्यावरणीय संस्थांना समजून-उमजून त्यांच्यासोबत समाज म्हणून प्रेमभाव निर्माण करण्याची गरजांची पुनर्तपासणी करून निसर्गाची कमीत कमी हानी होऊ देण्याची व निसर्गाने आपल्याला सढळ हाताने दिले ते तेवढ्याच सढळ हाताने त्याला देण्याची!
गरज आहे समजून घेण्याची की मेल्यानंतर जाळताना सुद्धा प्रतिमानशी वीस मन लाकूड लागते आणि यासाठी वीस झाडांची तोड करावी लागते.
यासाठीच आता हरित वसुंधरा निर्मितीचा ध्यास या कोरोनाशी लढा देताना सर्वांनीच मनाची घेतला पाहिजे. परत एकदा आम्ही पाहुणे आहोत आणि या पृथ्वीने आपल्याला खूप काही दिले आहे. आता वेळ आहे तिने दिलेल्याची परतफेड करण्याची! चला तर कोरोनाशी लढा देताना या मिळालेल्या कालावधीमध्ये सृष्टिचक्र नीट समजून घेऊया! आपल्या झालेल्या चुकांचा अभ्यास करूया. परत एकदा वसुधैव कुटुंबकम हा भाव जागा करूया चला जग वाचवूया. जिथे असू तिथे निसर्गाला सुरक्षित करू आणि स्वतःच्या कुटुंबालाही सुरक्षित करू!
- गुरू भांगे
Mo.8888421666
( लेखक शेतकरी असून पर्यावरण पूरक जीवन पद्धतीचे अभ्यासक आहेत.)
Share your comments