सर्वसामान्य शेतकरी, तरुण व नागरिकांचे माझ्यावर असलेल्या प्रेम आणि विश्वासाचा एक वेगळाच अनुभव सध्या येत आहे. मी आजारी असल्याचे समजल्यावर तब्येतीची चौकशी करण्यासाठी देऊळगाव मही येथील सामन्य शेतकरी पुरुषोत्तम नारायण शिंगणे व माझे काही सहकारी घरी आले. अनेक विषयांवर त्यांच्याशी चर्चा करतांना मी लोकसभेची निवडणूक लढवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दिल्लीत प्रतिनिधित्व करावे, नेतृत्व करावे, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.
परंतु निवडणूक लढविण्यासाठी खर्च लागतो हे आम्हाला माहीत आहे, हे त्यांनी बोलून दाखविले. नुसते बोलूनच न थांबता माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याने निवडणूक लढवावी व दिल्लीला जावे अशी इच्छा असलेल्या शिंगणे काकांनी निवडणुकीसाठी मला १ रु. लाख देण्याचा निश्चय सांगितला. त्यातील ॲडव्हान्स २५ हजारांचा रुपयांचा धनादेश त्यांनी मला लगेच देऊ केला.
हा प्रसंग माझ्या राजकीय जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांपैकी एक आहे. कारण या निधीमागील भावना महत्त्वाची आहे. एक वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून मित्रमंडळी, सहकारी व शेतकरी बांधवांनी मला चळवळीसाठी राज्यभर फिरण्याकरिता 'इंव्होवा क्रिस्टा' गाडी भेट दिली होती, अजूनही त्या गाडीच्या डिझेलचा फंड मित्रपरिवार व शेतकरी बांधव मोठ्या आत्मियतेने चालवत आहे.
मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो की २० वर्षांच्या अथक परिश्रमानंतर हा 'गोतावळा' मी कमावला आहे, हा 'गोतावळा' हीच माझी श्रीमंती आहे. मी सदैव सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी झटत असतांना माझ्या राजकीय भविष्याचा, प्रगतीचा तेही एवढा विचार करतात, हे मी अनेकवेळा अनुभवतो.
शिंगणे काकांच्या या प्रसंगाने माझ्यासह माझे कुटुंबीयही भारावून गेले. नकळत आमच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे पाणी तरळले. शेतकरी बांधवांनी नेहमीच मला घरातील सदस्याप्रमाणे प्रेम आणि सन्मान दिला आहे. मी आपले नेतृत्व करावे, अशी शेतकर्यांची तीव्र भावना आहे.
म्हणूनच पदरमोड करून ते मला निवडणूक लढवता यावी, यासाठी प्रयत्न करत आहेत. यामुळे मला अधिक जबाबदारीची जाणीव होत आहे. हा केवळ निधी नसून आशीर्वाद आहे, पाठबळ आहे आणि अद्वितीय अशी प्रेरणा आहे.
माझ्या मनाला उभारी आणि संकल्पाला बळ दिल्याबद्दल पुरुषोत्तम शिंगणे काकांचा मी मनापासून आभारी आहे. तुम्हा सर्वांचे प्रेम व सहकार्याच्या जोरावर आपण येणाऱ्या काळात ताकदीने मैदानात उतरू..! अशी पोस्ट शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.
Share your comments