पृथ्वीवरील बदललेली नैसर्गिक स्थिती पाहता अनेक नैसर्गिक संकटे येण्याची शक्यता आहे. हिंदी महासागराची जलद गतीने तापमानवाढ होत असल्याने भारतात नैसर्गिक आपत्ती नेहमी येईल असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अहवालात देण्यात आला आहे. त्यात मुंबईला सर्वाधिक धोका असल्यची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गेल्या दोन वर्षात आलेली चक्रीवादळे, तासाला शंभर मिमीपेक्षा जास्त पडणारा पाऊस, समुद्राला भरती असताना वाढणारी लाटांची उंची, शहरात तुंबून राहणारे पाणी, तापमानामध्ये झालेली वाढ, वाहने, वायू आणि विविध प्रकारचे प्रदूषण याचा विचार करता सन २०५० पर्यंत दक्षिण मुंबईतील ७० टक्के तसेच नरिमन पॉईंट, कफ परेड परिसरातील ८० टक्क्यांहून अधिक भाग पाण्याखाली जाणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईला वाचवण्यासाठी राज्य सरकारसह मुंबई महापालिका, एमएमआरडीए व अन्य शासकीय व निमशासकीय संस्था यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार नोव्हेंबर २०२१ पर्यंत 'मुंबई वातावरण कृती आराखडा' तयार करण्यात येणार आहे.
मुंबईतील वातावरणात गेल्या दहा वर्षापासून मोठा बदल सुरू झाला आहे. अवेळी पडणारा पाऊस, चक्रीवादळ, तापमानामध्ये होत असलेली वाढ यामुळे मुंबई शहराचे भवितव्य धोक्यात आले आहे. चार बाजूंनी समुद्राने वेढलेली व सात बेटांवर वसलेल्या मुंबईवरील संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाने पुढाकार घेतला आहे. शुक्रवारी मुंबई महापालिका मुख्यालयातील सभागृहात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई वातावरण कृती आराखडा संदर्भात सादरीकरण करण्यात आले. मुंबईची हवा, पाणी, जमीन, प्रदूषण या सर्वांचा अभ्यास करण्यात येत आहे.
आयुक्तांनी सांगितले धोक्याचे संकेत
महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सांगितले की, २०५० पर्यंत दक्षिण मुंबईतील ७० टक्के भाग पाण्याखाली जाणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कफ परेड, नरिमन पॉईंट येथील ८० टक्के भाग पाण्याखाली जाण्याची भीती आहे. पालिकेच्या कुलाबा ए विभाग डोंगरी बी विभाग चंदनवाडी सी विभाग व ग्रँट रोड डी विभागातील ७० टक्के भाग पाण्याखाली जाण्याची भीती आहे. त्यामुळे मुंबईसाठी पालिका प्राधान्याने वातावरण कृती आराखड्यासाठी आपले सहकार्य देईल.
हेही वाचा : काय असते ढगफुटी? कधी होते ढगफुटी, जाणून सर्व माहिती
मुंबईत १८९१ नंतर गेल्या १५ महिन्यात तीन चक्रीवादळे आली. याचा कोकणासह मुंबई शहराला मोठा फटका बसला. मुंबई शहरात साधारणता जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यांत पाऊस होतो. मात्र यावेळी १७ मे रोजी २१४ मिमी पाऊस झाला. त्यामुळे वातावरणामध्ये बदल होत असल्याचे स्पष्ट होते. पावसाचा लहरीपणा वाढत असून दररोज १०० ते २०० मिमी पाऊस पडण्याचे प्रमाण वाढते आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली.
२००७ नंतर मुंबईतील तापमानमध्ये वाढ
मुंबईत २००७ नंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर या महिन्यात तापमानामध्ये वाढ होताना दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी देखील तापमान वाढ होऊ लागली आहे. दहा वर्षापूर्वी ३५ सेल्सियस डिग्री असलेले तापमान आता ३८ ते ४० सेल्सियस डिग्रीपर्यंत पर्यंत पोहचत आहे.
वाहनांमुळे २४ टक्के प्रदूषण
मुंबई शहरात वाहनांमुळे सर्वाधिक प्रदूषण होत असून याचे प्रमाण २४ टक्के आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांवर आता भर देण्यात येत आहे. त्याशिवाय मियावाकी उद्यानासह जास्तीत जास्त झाडे लावण्यात येणार आहेत.
Share your comments