मुंबई एपीएमसी कांदा-बटाटा मार्केटसमोर अनेक समस्यांचा डोंगर उभा आहे. परिणामी, व्यापार टिकवणे हे व्यापारी वर्गाला मोठे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे संबंधित मार्केटशी निगडित बाजार घटक उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या मार्केटमध्ये एका अडचणीतून मार्ग निघत नाही तोच दुसरी अडचण आ वासून उभी रहाते. त्यामुळे कांदा-बटाटा मार्केटमधील व्यापार धोक्यात आला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आतापर्यंत विविध पक्षांचे मंत्री व नेते आले आणि गेले. पण बाजार आवारातील समस्या जैसे थे राहिल्याने बाजार घटक हताश झाला आहे.
कोणता दिवस या मार्केटसाठी काय समस्या घेऊन येईल, हे सांगणे कठीण झाले आहे. त्यामुळे उजाडलेल्या दिवसाला सामोरे जाऊन व्यापार टिकवण्याचा प्रयत्न करणे एवढेच आता व्यापाऱ्यांच्या हाती राहिले आहे. ३० वर्षाहून अधिक कांदा-मार्केट जुने असल्याने इमारतीसह अनेक मूलभूत सुविधा जीर्ण झाल्या आहेत. शिवाय २००३ सालापासून म्हणजेच जवळपास १९ वर्षांपूर्वी या मार्केटला नवी मुंबई महापालिकेकडून धोकादायक ठरवण्यात आले. तरी देखील मार्केटचा पुनर्विकास अद्याप झालेला नाही.
मार्केटच्या इमारतीला ठिकठिकाणी टेकू देऊन येणारे संकट काही काळ दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जवळपास प्रत्येक पाकळीमध्ये स्लॅब कोसळण्याची भीती निर्माण झाल्याने प्रतिदिन जीव धोक्यात घालून बाजार घटक वावरत आहेत. नियमनमुक्तीने मुंबई APMC कांदा-बटाटा मार्केटमधील व्यापारपद्धती काहीअंशी कोलमडली आहे. माथाडी कामगार आणि व्यापारी यांच्यातील ५० किलो पेक्षा अधिक वजनाचा वाद काही दिवसाच्या अंतराने पुन्हा-पुन्हा उद्भवून येतो.
त्यामुळे कांदा-बटाटा मार्केटमध्ये ५० किलोपेक्षा अधिक वजनाचा माल आल्यास तो उतरवला जात नाही. परिणामी शेतमालाचे नुकसान होऊन सर्व घटकांना नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे माथाडी आणि व्यापारी यांच्यामध्ये सातत्याने संघर्ष निर्माण होत आहेत. तर माथाडी कामगार काबाडकष्ट करून मार्केटच्या विविध समस्या त्यांच्या रोजगारावर परिणाम करत आहेत. भाजीपाला मार्केट स्वतंत्र भाज्यांसाठी असताना त्या ठिकाणी कांदा-बटाटा, लसूण विक्री केला जातो. भाजीपाला व्यापारी थेट शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कांदा-बटाटा मागवून विक्री करत असल्याने त्याचा देखील परिणाम कांदा बटाटा मार्केटमधील व्यापाऱ्यांवर होत आहे.
तसेच सप्लायच्या नावाखाली कांदा, बटाटा लसणाचा या ठिकाणी साठा करून विक्री करण्यात येते. कांदा बटाटा व्यापारी प्रतिनिधी आणि भाजीपाला मार्केट उपसचिव यांनी भाजीपाला मार्केटमधील कांदा-बटाटा व्यापाराची पाहणी केली. या पाहणी दरम्यान या ठिकाणी सप्लाय ऐवजी कांदा-बटाटा किरकोळ व्यापार होत असल्याचे निदर्शनास आल्याने या अनधिकृत व्यापारावर कारवाई करून शेतमाल जप्त करण्याची मागणी अधिकृत कांदा-बटाटा व्यापाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे मुंबई एपीएमसी मार्केटचे कांदा-बटाटा व्यापार शेवटच्या घटका मोजत आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे.
Share your comments