मुंबई: द्राक्षांची बाग कशी असते, शेतकरी त्याचे उत्पादन कसे घेतात, द्राक्षांचे वेगवेगळे प्रकार कोणते, द्राक्षांपासून वाईनची निर्मिती कशी होते अशा नानाविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याबरोबरच द्राक्षांची प्रत्यक्ष शेतात जाऊन चव चाखण्याची संधी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी येत्या 16 ते 19 फेब्रुवारी दरम्यान द्राक्षगांव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोळेगाव (लेण्याद्री), ता. जुन्नर, जि. पुणे येथे जुन्नर द्राक्ष महोत्सव (Junnar Grape Festival) आयोजित करण्यात आला आहे. एमटीडीसीचे माळशेज घाट रिसॉर्ट आणि जुन्नर तालुक्यातील द्राक्ष शेतकरी यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव होत आहे.
ठाणे आणि पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर होत असलेल्या या महोत्सवात पर्यटक कोणत्याही एका दिवशी सहभागी होऊ शकतात. यासाठी पर्यटकांना सकाळी 10 वाजता माळशेज घाट येथील एमटीडीसी रिसॉर्टवर पोहोचावे लागेल. त्यानंतर गोळेगाव येथील द्राक्ष बागेला प्रत्यक्ष भेट देऊन द्राक्ष पिकाबाबत माहिती, द्राक्षांचीतोडणी, पॅकींग, विक्री कशी केली जाते याची पर्यटकांना माहिती दिली जाईल. पर्यटकांना द्राक्षांची थेट बागेत जाऊन चव चाखता येईल. याशिवाय थेट शेताच्या बांधावरुन द्राक्षांची खरेदी करता येईल. दुपारी 1 वाजता कृषी पर्यटन केंद भेट, शेतात फेरफटका आणि तिथेच शेताच्या बांधावर बसून पर्यटकांना जेवणाचा आनंद घेता येईल. त्यानंतर वाईनरीला भेट देण्यात येईल. इथे पर्यटक द्राक्षापासून वाईन तयार करण्याची प्रक्रिया जाणून घेऊ शकतील. त्यानंतर सायंकाळी 4.30 वाजता ग्रामीण बचतगटांच्या मशरुम बागेला भेट, मशरुम पिकाची महिती घेणे तसेच पॅकींग व विक्रीची माहिती पर्यटकांना घेता येईल.
या सर्व स्थळांना भेटी देण्यासाठी प्रत्येकी फक्त 50 रुपये इतकी प्रवेश फी असून या स्थळांना भेट देण्यासाठी एमटीडीसीमार्फत वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. महोत्सवात सहभागी होण्यासाठी पर्यटकांना माळशेज घाट येथील एमटीडीसी रीसॉर्टवर किंवा गोळेगाव (लेण्याद्री), ता. जुन्नर, जि. पुणे येथे पोहोचावे लागेल. अधिक माहितीसाठी माळशेजघाट एमटीडीसी रिसॉर्टचे व्यवस्थापक विष्णू गाडेकर यांच्याशी संपर्क साधावा. (मो. 9822043175, 7768036332)
माळशेज घाट येथे कसे पोहोचावे
मुंबई येथील पर्यटक कल्याण मुरबाडमार्गे येथे पोहोचू शकतात. कल्याणपासून हे ठिकाण 90 किमी अंतरावर आहे. पुण्यातील पर्यटक राजगुरुनगर-नारायणगाव-आळेफाटा या मार्गे माळशेज घाट येथे पोहोचू शकतात. पुण्यापासून हे ठिकाण 120 किमी अंतरावर आहे. नाशिक येथील पर्यटक संगमनेर-आळेफाटा येथून या ठिकाणी पोहोचू शकतात.
Share your comments