शेतकरी अशिक्षित असल्याने विविध कामांसाठी महावितरण शेतकऱ्यांना वेठीस धरत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय नवीन वीज जोडणीला देखील त्रास दिला जात असल्याची राज्यात असंख्य उदाहरणे समोर येत असतात. तर अनेक गोरगरीब शेतकऱ्यांकडे लाच मागण्याचा निर्लजपणा महावितरण अधिकारी करतात. आता तर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात महावितरण कंपनीचा अजब गजब कारभार समोर आला आहे. वीज न वापरताच वीज बिल पाठवण्याचा प्रताप महावितरण अधिकाऱ्यांनी केला आहे.
तालुक्यातील अंजनडोह येथे वीजजोडणी न देताच रत्नमाला मुळे व रविंद्र आगलावे दोन शेतकऱ्यांना भरमसाठ वीज बील देण्यात आले आहे. एका शेतकऱ्याला ५९ हजार ७८० तर दुसऱ्या शेतकऱ्याला ५७ हजार ४४० रुपये बील महावितरणकडून पाठवण्यात आले आहे. वीज न वापरात आलेले वीज बिल आणि त्याचा आकडा पाहून शेतकऱ्यांना धक्का बसला आहे. तर त्यांनी बील त्वरीत रद्द कारण्याची मागणी वीजवितरण कंपनीकडे केली आहे.
शिवाय वीज बिल मागे न घेतल्यास उपोषणाचा इशाराही दिला आहे. शिवाय पाठवण्यात आलेले बिल सात वर्षांचे आहे, त्याची मागणी सात वर्षानंतर शेतकऱ्यांकडे करण्यात आल्याने या निमित्ताने महावितरण कार्यालयाचा भोंगळ कारभार स्पष्ट होत आहे. तर या प्रकाराविरोधात शेतकऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. रत्नमाला मुळे आणि रविंद्र आगलावे या दोन शेतकऱ्यांची अंजनडोह येथे शेती आहे. त्यांनी विहीरीवर वीज जोडणी घेण्यासाठी ‘महावितरण आपल्या दारी’ उपक्रमांर्गत अर्ज केले होते.
२०१४ मध्ये त्यांनी पाच एचपी पंपासाठी ६२०० रुपये कोटेशन स्वरूपात भरले होते. त्यानंतर त्यांना खासगी ठेकेदाराकडून पोल रोवून घेण्याबाबत महावितरणने कळवले. शेतकऱ्यांनी सूचनेनुसार पोल रोवून घेतले मात्र जोडणीसाठी त्यांना परवानगी देण्यात आली नाही. तर अद्याप त्यांना जोडणी दिली नसून सुद्धा ७ वर्षाचे वीज बील मात्र देण्यात आले आहे. शिवाय हे वीजबिल न भरल्यास विहिरीवर वीज जोडणी दिली जाणार नाही असे देखील सांगण्यात आले आहे. यामुळे याची चर्चा सुरु आहे.
Share your comments