रायगड
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावावर काळाने घाला घातलाआहे. बुधवारी (दि.१९) रोजी या ठिकाणी दरड कोसळून इर्शाळवाडी गाव दरडखाली येऊन उद्ध्वस्त झालं आहे. या ठिकाणी NDRF कडून बचावकार्य सुरु आहे. घटनेत मृत्यू झालेल्या लोकांचा नेमका आकडा अद्याप समजू शकला नाही.
दुर्घटना घटल्याचे समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ दुर्घटना स्थळी जाऊन घटनेचा आढावा घेतला आहे. प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे बचाव कार्य कार्यात अडथळा येत असला तरी हवामानात सुधारणा झाल्यानंतर तात्काळ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येईल. तसंच सर्व यंत्रणा बचाव कार्यात सहभागी झाल्या आहेत. एनडीआरएफ पथकांकडून बचाव कार्य सुरू आहे, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी दिली.
या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत करण्यात येणार आहेत. तसेच दुर्घटनेतील जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे . तसंच मुख्यमंत्र्यांनी गावात जाऊन मृतांच्या कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन देखील केलं आहे.
दरम्यान, मुंबई-पुणे जुना महामार्गावरुन जात असताना कर्जत आणि पनवेलच्या मधोमध इर्शाळगडला जाण्यासाठीचा रस्ता आहे. इर्शाळगड हा रायगडमधील प्रसिद्ध ट्रेकिंग पॉईंट आहे. खालापूरजवळून मोरबे डॅम मार्गे गावाकडे जाण्याचा रस्ता आहे. पावसाळ्यामुळे शनिवार आणि रविवारी ट्रेकर्सची पाऊलं इर्शाळगडाकडे वळतात. वीकेंडला गडावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात.
Share your comments