पुणे : केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर काही तासांतच नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी कर्नाटकच्या दिशेने आगेकूच केली आहे. तर पुढील दोन तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या सुधारित अंदाजानुसार, सध्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, लक्षद्विप आणि केरळातील उर्वरित भागासह दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळाडूच्या या भागांना व्यापलं आहे. बंगालच्या उपसागरातही मान्सून दाखल झाला आहे.
या व्यतिरिक्त, पुढील २ ते ३ दिवसांत राज्यात बहुतांशी ठिकाणी विजांच्या गडगडासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये ठाणे, रायगड, द. कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.दरम्यान, येत्या तीन ते चार तासांत पुण्यासह, बारामती, शिरूर, इंदापूर, रायगड, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि आसपासच्या परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
कसा असेल यंदाचा मान्सून
आयएमडी (IMD) म्हणजे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे की, यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. त्यामुळे यंदाच्या मान्सूनमध्ये पर्जन्यवृष्टी ९२% ते १०८% इतकी होऊ शकते. हाच मान्सून दख्खनच्या पठारावर ९३% ते १०८% इतका कोसळू शकतो. याशिवाय उत्तर-पूर्व भारतातही मान्सून दमदार हजेरी लावण्याची शक्यता आहे. उत्तर-पूर्व भारतात ९५% तर मध्य भारतात १०६% इतका पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, जुलै महिन्यात पर्जन्यमान कसे राहील याबाबत आयएमडी जून महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात पुन्हा अंदाज वर्तवणार आहे.
मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज
या आधी भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस मान्सूनपूर्व पाऊस पडणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता सुधारित अंदाजानुसार, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. केरळात मान्सून उशीरा दाखल होणार असल्याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवणार आहे. कोकणातही आता दोन दिवस उशिरा मान्सूनचे आगमन होणार आहे.
Share your comments