राज्यात मॉन्सून सक्रिय झाला असून अनेक भागात वरुणराजाने हजेरी लावली. सुरुवातीच्या पावसातच नदी नाल्यांमध्ये पाणी भरून वाहू लागले आहेत. दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण, घाटमाथा, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. काल सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पावसामुळे नद्या, नाले, ओढ्यांना पूर आले आहेत. पाऊस चांगला झाल्याने आता पेरण्याच्या कामांना वेग आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
मंगळवारी पावसाचा जोर कायम असून पावसाने झोडपून काढले. नदी नाले दुथडी वाहू लागले. मराठवाड्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद, जालना, जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, तर उस्मानाबाद जिल्ह्यातही कमी - अधिक प्रमाणात पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील पाथरी मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. मुसळधार पाऊस झाल्याने शेतांमध्ये पाणी तुंबले. यादरम्यान शेतकऱ्यांचे थोडे नुकसान झाले आहे. नुकतेच पेरणी केलेले बियाणे वाहून गेले. नगर जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. वरुण राजाने वेळेत हजेरी लावल्याने खरीप पेरण्यांना वेग आला आहे. लवकर पाऊस झाल्याने कापसाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता केली जात आहे. अकोले तालुक्यातही दमदार पाऊस झाला. पुणे कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतही पावसाने जोर धरला आहे. कोल्हापुरातील गगणबावडा येथे १०९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. विदर्भातही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून भंडाऱ्यातील पवनी येथे १३० मिलीमीटर पाऊस पडल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.
Share your comments