कोकण घाटमाथ्यावर पावसाने जोर धरला आहे, पण राज्यातील इतर भागात मात्र पावसाने उडीप दिली आहे. आज कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्याता हावामान विभागाने वर्तवली आहे. सोमवारपासून राज्यात पुन्हा पाऊस जोर धरेल असा अंदाज आहे. मध्य पाकिस्तानपासून आसामपर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. तर उत्तर प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. यामुळे पूर्व आणि ईशान्य भारतात मंगळवारपर्यत जोरदार पावसाची शक्यता आहे. मंगळवारपासून विदर्भात मुसळधार पाऊस होण्यास पोषक हवामान आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्याता आहे. दरम्यान अरबी समुद्रात ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्याने मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान उत्तरेकडे प्रगती करणाऱ्या मॉन्सूनची गती जरा रेंगाळली आहे. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशाच्या काही भागात दाखल झाल्यानंतर मॉन्सून प्रगती केलेली नाही. सोमवारपासून उत्तरप्रदेशाच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होणार आहे. उत्तरप्रदेशाच्या काही जिल्ह्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाल्याने नागरिकांनी गारवा अनुभवला.
मागील २४ तासात कर्नाटकाच्या किनारपट्टी , कोकण, आणि गोवासह मेघालय, आसामच्या काही भागात मॉन्सून सक्रिय होता. बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्येही हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ, तेलंगाणा, आंध्रप्रदेशातील किनारपट्टीटचा भाग, तामिळनाडूमधील अंतर्गत भाग, केरळ, अंदमान व निकोबार येथे हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला.
Share your comments