Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University : अकोला जिल्ह्यातील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ स्थापना दिनाचे औचित्य साधून कृषी विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे अकोला येथे तीन दिवसीय शिवार फेरी, पीक प्रात्यक्षिक व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या शिवार फेरीच्या उद्घाटन समारंभास केंद्रीय रस्ते विकास मंत्री आदरणीय नितीन गडकरी यांच्या उपस्थित पार पडले. या कार्यक्रमासाठी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे देखील यावेळी उपस्थित होते.
या शिवार फेरीत पिकांमधील अनेक विविध नवनवीन प्रयोग शेतकऱ्यांच्या अभ्यासासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कृषी विद्यापीठात होत असलेले संशोधन सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना त्याचा लाभ मिळावा हाच प्रमुख उद्देश या शिवाय फेरीमागे असतो.
या समारंभात मार्गदर्शन करताना पारंपारिक शेतीच्या जोडीला आधुनिक तंत्रज्ञान तसेच मागणी, राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय बाजार पेठ, तसेच पुरवठ्याची आवश्यकता यानुसार पिकांमध्ये नाविन्यता व आधुनिकता आणली जावी. मागणीनुसार पेरणी व पुरवठा हे सूत्र अवलंबल्यास शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
कृषी विद्यापीठ आणि राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागण्या तसेच त्या संदर्भातील विविध माहिती ऑनलाईन उपलब्ध करून देण्याबाबत नितीन गडकरी केलेल्या सूचनांचे पालन कृषी विभाग करेल असा शब्द यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला.
दरम्यान, महाराष्ट्रात भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी असल्यामुळे पावसाचे प्रमाण प्रत्येक क्षेत्रात कमी जास्त आहे या असमतोलावर मात करून जास्तीत जास्त उत्पन्न शेतकऱ्यांना मिळावे यासाठी हवामानाला अनुरूप असणाऱ्या बियाण्यांचे संशोधन तसेच शेतकऱ्यांचे श्रम कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर कृषी विद्यापीठांनी भर द्यावा असे मत यावेळी बोलताना व्यक्त केले.
Share your comments