राज्यातील काही ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. विदर्भातही अनेक ठिकाणी पाऊस झाला. तर कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडत आहे. दरम्यान अजून पुढील पाच ते सहा दिवस राज्यातील अनेक भागात वादळी वारे, विजांसह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. तसेच आंध्र प्रदेशाच्या दक्षिण किनारपट्टीजवळ असलेले चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे राज्यात पावसासाठी वातावरण बनत आहे.
ही स्थिती पुढील काही दिवस राहणार आहे. त्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान असून राज्यातील काही भागात पावसाने जोर धरला आहे. सध्या राज्यातील काही भागात सकळापासून ऊन पडत आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ होत असून कमाल तापमानात वाढ होत आहे. त्यातच मध्यरात्री हवेत कहीसा गारवा तयार होत आहे. तर सकाळी काहीसे धुके पडत असल्याची स्थिती आहे. सोलापूर येथे ३४.७ अंश सेल्सिअस सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली.
पुण्यातही कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली असून सरासरीच्या तुलनेत १.३ अंश सेल्सिअसने वाढ झाली. पुण्यात ३२.९ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले. तर महाबळेश्वर येथे १६.० अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमान नोंदविले गेले. दरम्यान अमरावती जिल्ह्यात गुरुवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. या जिल्ह्यातील वरुड तालुक्यात ४४.६ मिमी इतका पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली. आज देखील येथील वातावरण हे ढगाळ आहे.
Share your comments