राज्यातील काही भागात आज मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्यासह मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्राच्या पूर्व - मध्य भाग व आग्नेय भागात कमी दाबाचे क्षेत्र असून त्याचे चक्क्राकार वाऱ्यामध्ये रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणात बुधवार तर विदर्भात गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्यास सुरुवात होत आहे. राज्यातील तापमानतही झपाट्याने बदल होत आहे.
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सरासरीच्या तुलनेत कमाल व किमान तापपमान वाढले आहे. दुपारच्या वेळेत उन्हाचा चांगलाच चटका वाढत आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत पाच ते सहा अंश सेल्सिअस पर्यंत वाढला असून बहुतांश ठिकाणचे तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. मध्य प्रदेशात असलेली चक्रकार वाऱ्याची स्थिती विरुन गेली आहे. याचा परिणाम राज्यातील हवामानावर झाला आहे.
रविवारी सकाळपर्यंत नगरमधील राहाता येथे ३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह व विजांच्या कडकडाटस पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, जिल्ह्यातील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.
Share your comments