दुष्काळी परिस्थितीत मिशन मोड वर काम करावे

Tuesday, 13 November 2018 07:02 AM


बीड:
जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांना चारा आणि लोकांच्या हाताला काम देण्यासाठी मग्रारोहयो अंतर्गत कामांचे नियोजन करुन शासकीय यंत्रणा संवदेनाक्षम आहे, अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली पाहिजे, असे सांगूण कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या हिश्शाचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही. 2,200 कोटी रुपये नाबार्ड कडून उपलब्ध् करुन दिले जाणार असून हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी उर्वरित 1,600 कोटीही उपलब्ध करुन मराठवाड्याला हक्काचे पाणी उपलब्ध करुन दिले जाणार असल्याची ग्वाही देऊन दुष्काळातील कामांना प्रशासनाने प्राधान्यक्रम देऊन ‘मिशन मोड’ मध्ये काम करावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राज्याच्या ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जिल्हा परिषद अध्यक्ष सविता गोल्हार, खासदार प्रितम मुंडे, आमदार सर्वश्री विनायक मेटे, सुरेश धस, जयदत्त क्षीरसागर, भीमराव धोंडे, लक्ष्मण पवार, आर. टी. देशमुख, श्रीमती संगीता ठोंबरे, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, प्रभारी जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे आदी उपस्थित होते. बैठकीच्या सुरूवातीला केंद्रीय संसदीय कार्य तसेच रसायन व खते मंत्री अनंतकुमार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

मुख्यमंत्री म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीवरील उपाययोजना राबवताना प्रशासनाने मिशन मोडवर काम करावे तसेच या काळात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवावा. सध्या जनावरांसाठी शंभर दिवस पुरेल एवढा चारा उपलब्ध आहे. परंतु त्यापुढील काळात चाऱ्याचे योग्य पद्धतीने नियोजन करुन रब्बी हंगामात शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी बी बियाणे उपलब्ध करुन देण्याची सूचना केली. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत 2017-18 साली 3385 कामांपैकी 2,487 कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे डिसेंबर पर्यंत पूर्ण करावीत. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत 2017-18  साली 90 तलावांतून सहा लाख 52 हजार घनमीटर गाळ काढलेला आहे. या कामात 668 शेतकरी आणि 11 स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला. दुष्काळाच्या परिस्थितीत ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक असून आगामी काळात जिल्ह्यात एक हजार तलावांमधील गाळ काढून हा गाळ छोट्या शेतकऱ्यांना देण्यात यावा.

मग्रारोहयो सिंचन विहीर अंतर्गत सात हजार 263 विहीरींपैकी चार हजार 155 विहीरींची कामे पूर्ण झाली आहेत. यापुढे भूजल सर्वेक्षण विभागाने निश्चित केलेल्या विहीरींची कामे तात्काळ पूर्ण करावीत. मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत जिल्ह्यास 6,500 चे उद्दिष्ट दिले होते त्याऐवजी सात हजार 131 शेततळे पूर्ण करुन जिल्ह्याने 110 टक्के काम करुन उद्दिष्टापेक्षा जास्त काम केले आहेत. तथापि यापुढे आणखी उद्दिष्ट वाढवून दिले जाईल. दुष्काळाच्या परिस्थितीत उद्दिष्टांची पूर्ती करा निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.

beed Devendra Fadnavis krushna khore mission mode देवेंद्र फडणवीस मिशन मोड बीड कृष्णा खोरे नाबार्ड NABARD

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2019 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.