इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या धोरणांतर्गत केंद्र सरकारने राज्यांना सरकारी कामकाजासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. केंद्रीय अपारंपरिक ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी या संदर्भात सर्व केंद्रीय मंत्र्यांना तसेच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना तसेच केंद्रातील मंत्र्यांना पत्र पाठवून इलेक्ट्रिक वाहने वापरण्याचे आवाहन केले आहे.
कार्बन उत्सर्जन कमी करणे, ऊर्जा सुरक्षा वाढविणे यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. याआधी सरकारी कामकाजासाठी या ई वाहनांचा वापर करण्याबाबत परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला होता. तर मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात शिवसेनेचे अवजड उद्योग खात्याचे मंत्री अनंत गीते यांनी ई-वाहन वापरणे सुरूही केले होते. मात्र, या वाहनांचा अपेक्षित प्रमाणात वापर झाला नाही.
आता पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे ई-वाहनांनी लक्ष वेधले असले तरी हा वापर प्रामुख्याने दुचाकी वाहनांपुरताच मर्यादित आहे. त्यापार्श्वभूमीवर सरकारने या वाहनांच्या उपयोगासाठी स्वतःपासून सुरवात करण्याचा प्रयत्न आरंभिला आहे. अपारंपरिक ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या धोरणांतर्गत केंद्रीय मंत्री, राज्य मंत्री तसेच सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शासकीय कामकाजासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्याची सूचना केली आहे.
दरम्यान, सरकारी वाहनांच्या ताफ्यामध्ये पेट्रोल डिझेलवर चालणारी वाहने बदलून इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करावा, असे सुचविले आहे. अशा प्रयत्नांमुळे जनतेपुढे उदाहरण ठेवता येईल आणि ई-वाहनांच्या प्रसारासाठी सर्वसामान्यांना प्रोत्साहन देता येईल, असेही आर. के. सिंह यांनी म्हटले आहे.
Share your comments