
Water News Update
छत्रपती संभाजीनगर : शासनाच्या विविध योजना आणि उपाययोजनाद्वारे मराठवाड्यावरील जलसंकट दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. या प्रयत्नांमध्ये सगळ्यांचा सहयोग आवश्यक आहे, असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी आज येथे केले.
जागतिक जल दिनानिमित्त शहरात वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले. विभागीय क्रीडा संकुल येथून सुरुवात होऊन संत गजानन महाराज मंदिरापर्यंत जाऊन पुन्हा क्रीडा संकुल येथे समारोप करण्यात आला. या वॉकेथॉनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमास पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले, सामाजिक वनिकरण विभागाच्या विभागीय वन अधिकारी कीर्ती जमदाडे, जिल्हा क्रीडा अधिकारी संभाजी देसाई, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, स्टरलाईट चे मिलिंद पाटील, ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीपसिंग बयास, जिल्हा समन्वयक किरण बिलोरे यांसह विविध विभागांचे अधिकारी, सामाजिक संस्था आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पाण्याच्या जपून वापराबाबत मार्गदर्शन करत जलसंवर्धनासाठी प्रशासनाने हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.
राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सांगितले की, मराठवाड्याच्या जलसमृद्धीसाठी शासन विविध उपक्रम राबवत असून, त्याला सर्व संस्थांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जलसंकट दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीपसिंग बयास यांनी केले. सूत्रसंचालन मीनाक्षी बालकमल यांनी केले, तर आभार प्रदर्शन किरण बिलोरे यांनी केले.
Share your comments