मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत ते चर्चा करणार आहेत. ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यांना परिस्थितीची जाणीव आहे, असं मंत्री अब्दुल सत्तार म्हटले आहेत. आरक्षणात कुणीही खोडा घालण्याचा प्रयत्न करत असेल तरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आरक्षण देण्यावर ठाम आहेत, असंही सत्तार यांनी स्पष्ट केलं.
ओबीसी समाजाच्या भावना लक्षात घेऊन ओबीसीचं आरक्षण कमी न करता कायद्याच्या चौकटीत आरक्षण बसवण्यात येणार आहे. 75 दिवस थांबणार नसेल तर कसं होईल? संयम ठेवावा. काही दिवस थांबणं योग्य ठरेल. तुमच्या प्रत्येक मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. नेत्यांना गावबंदी हा पर्याय असू शकत नाही. सुख-दुःखाच्या कार्यक्रमात जावं लागेल. सामाजिक, धार्मिक, लग्न कार्यात जावं लागेल, असं करू नका. शेवटी राजकारणात व्यक्ती स्वतंत्र आहे, असंही अब्दुल सत्तार म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सक्षम आहेत. ते मराठा समाजाचे आहेत. ते जेव्हा शिवरायांची शपथ घेऊन सांगतात तेव्हा शंका घेण्याचं काम नाही. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य आहे, असंही सत्तार यांनी स्पष्ट केलं आहे.
Share your comments