1. बातम्या

Millet Year 2023 : कृषी सल्ला: आरोग्यदायी राळा पीक लागवड ते काढणी आणि मळणी

राळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते. अर्धशिशी, निद्रानाश, कॉलरा, ताप यांच्या उपचार पद्धतीमध्ये राळ्याचा प्रामुख्याने वापर केला जातो. राळ्याचा अँटिऑक्सिडण्ट हा गुणधर्म रोगप्रतिकारशक्ती वाढवतो.

Millet Year 2023

Millet Year 2023

Foxtail Millet : यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. यंदाच्या वर्षातील प्रत्येक महिना एका तृणधान्यासाठी समर्पित केला आहे. सप्टेंबर महिना ‘राळा’ या तृणधान्यासाठी समर्पित केला आहे. राळ्याला पारंपरिक महत्त्व आहे. या महिन्यात धार्मिक कार्य केले जातात. यासाठी ‘राळा’ अतिशय महत्त्वाचा आहे. आरोग्यदृष्ट्याही राळा या तृणधान्याला महत्त्व आहे.

‘राळा’ पिकाचे महत्त्व :
राळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते. अर्धशिशी, निद्रानाश, कॉलरा, ताप यांच्या उपचार पद्धतीमध्ये राळ्याचा प्रामुख्याने वापर केला जातो. राळ्याचा अँटिऑक्सिडण्ट हा गुणधर्म रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. लोहाचे प्रमाण जास्त असल्याने मेंदूला ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवून मेंदूची कार्यक्षमता वाढवते. मोड आलेले राळा खाल्ल्यास हाडांचा ठिसूळपणा कमी होऊन हाडे बळकट होतात. मधुमेह आणि पोटाच्या आजारांवर ‘राळा’ हे पौष्टिक अन्न म्हणून उपयुक्त आहे.

राळा (Foxtail millet) : पिकाची ओळख, महत्त्व व सुधारित लागवड तंत्रज्ञान
राळा (Foxtail millet) हे गवतवर्गीय कुळातील पीक असून या पिकाचे शास्त्रीय नाव [Setaria italica (L). Beauv] असे आहे. या पिकाची धान्य व तसेच चारा म्हणून आशिया, आफ्रिका व अमेरिका खंडात लागवड केली जाते. या पिकाचे स्वपरागीभवन, कमी पक्वता कालावधी व C4 वर्गीय तृणधान्य हे प्रमुख गुणधर्म आहेत. भारतात या पिकाची आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, राजस्थान, महाराष्ट्र, तामिळनाडू, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यात लागवड केली जाते.

पौष्टिक भरडधान्य पिकांचे लागवडीच्या दृष्टीने महत्त्व :
कमी पक्वता कालावधी असणारी पिके, हलक्या व जमिनीत उत्तम वाढ होते. वाढीच्या काळात कमीत कमी निविष्ठा वापरून वाढ पूर्ण करतात,सुधारित तंत्रज्ञानानुसार लागवड केल्यास उत्तम प्रतिसाद देणारी व अधिक उत्पादन देणारी पिक आहेत. बदलत्या हवामानात तग धरणारी पिक व तसेच आकस्मिक शेतीकरिता नियोजन केले जाऊ शकते. उत्तम प्रकारचे पौष्टिक गुणधर्म असल्याने आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर. भविष्यात मागणी वाढणारी पीक आहे.

राळा पिकाचे पौष्टिक गुणधर्म :
अ) प्रथिने व खनिज पदार्थ: ‘राळा’ आहाराच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पौष्टिक तृणधान्य आहे. पौष्टिक घटकांबरोबरच चांगल्या प्रतीचे पोषक तंतुमय पदार्थ असल्याने बद्धकोष्ठता होत नाही. राळा या पिकाच्या धान्यामध्ये सर्वाधिक प्रथिनांचे प्रमाण व स्निग्ध पदार्थ आहेत. तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक आणि लोह या खनिजाचे प्रमाण जास्त आहे. ब) जीवनसत्वे:भरडधान्य पिकांचा आणखी वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म म्हणजे या पिकांमध्ये मुबलक असलेले जीवनसत्वाचे प्रमाण. राळा धान्यामध्ये थायमिन बी-१, रायबोफ्लेवीन बी-२, नियासिन (बी-३) व फॉलिक अॅसिड याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

‘राळा’ पिकाच्या धान्यामध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण अधिक असल्याने अन्न पचन होण्यास मदत होते. पचनाशी निगडीत व्याधी कमी केले जाऊ शकतात. नित्य सेवन करणाऱ्या लोकांमध्ये हृदयरोग, आतड्यांवरील व्रण आणि मधुमेहाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. धान्यापासून भाकरी, माल्ट, नुडल्स, पापड, इडली, बिस्कीटे यासारखे खाद्यपदार्थ तयार करता येतात. तसेच गरोदर माता व लहान मुलांच्या खाद्यामघ्ये वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.

सुधारित लागवड तंत्रज्ञान :
जमीन व हवामान : या पिकाच्या लागवडीसाठी हलकी ते मध्यम, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन उत्तम आहे. महाराष्ट्रात या पिकाची लागवड अत्यल्प क्षेत्रावर केली जाते. दक्षिणेकडील आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यात लागवड क्षेत्र अधिक आहे. तसेच या पिकाची लागवड ५०० ते ७०० मि.मी. वार्षिक पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी करता येऊ शकते.

पूर्वमशागत :
जमिनीची खोल नांगरट करुन उभ्या आडव्या कुळवाच्या दोन पाळ्या देऊन ४ ते ५ टन शेणखत/कंपोस्ट खत याचवेळी शेतात मिसळून जमीन भुसभुशीत करावी. पूर्वी घेतलेल्या पिकाचे धसकटे, काडीकचरा व बहुवार्षिक गवताचे अवशेष वेचून शेत स्वच्छ करावे.

सुधारीत वाण :
राज्यात लागवड केले जाणारे सुधारित वाण महाराष्ट्रात राळा या पिकाचा ‘पी.डी.के.व्ही. यशश्री’ (BFTM 82) वाण लागवडीसाठी सन २०२३ मध्ये शिफारसित करण्यात आलेला आहे. हा वाण डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषि संशोधन केंद्र, बुलढाणा येथून विकसित करण्यात आलेला आहे.

‘पी.डी.के.व्ही. यशश्री’ वाणाची ठळक वैशिष्ट्ये :
धान्य उत्पादन क्षमता (२३२४ कि./हे.), कडबा उत्पादन क्षमता (४४८९ कि./हे.), या वाणाचे दाणे मध्यम टपोरे असून रंग आकर्षक फिक्कट पिवळसर आहे. हा वाण ८१-८५ दिवसात पक्व होतो. या वाणाचे कणीस घट्ट असतात. हा वाण करपा आणि तांबेरा रोगास सहनशील आहे.

बियाणे व पेरणीची पध्दत पेरणीची/लावणीची वेळ :
या पिकाचा खरीप हा प्रमुख हंगाम आहे. बियाणे पेरणी पावसाचे आगमन होताच अथवा पाण्याची सुविधा असल्यास जूनच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. रोपांची लागण रोपे २० ते २५ दिवसांची झाल्यावर जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात मुख्य शेतात ओळीमध्ये करावी.

बियाणे प्रमाण :
पेरणीद्वारे पिक लागवड करायची असल्यास ओळीमध्ये पेरणी करावी. त्यासाठी ८ ते १० किलो बियाणे प्रति हेक्टरी वापरावे. धान्याचा आकार लहान असल्याने त्यामध्ये २ ते ४ पट माती एकत्र करून पेरणी करावी म्हणजे पेरणी दाट होणार नाही. बियाणे १ ते १.५ से. मी. पेक्षा जास्त खोल जाणार नाहीत याची काळजी घ्यावी म्हणजे उगवण चांगली होते.

पेरणी अंतर :
पेरणी करताना दोन ओळीमधील अंतर ३० से.मी. (एक फुट) व दोन रोपामंधील अंतर १० से.मी. ठेवावे.

खत व्यवस्थापन :
पेरणीपूर्वी एक महिना अगोदर शेणखत अथवा कंपोष्ट खत ५ ते १० टन प्रतिहेक्टर या प्रमाणे जमिनीत मिसळून द्यावे. राळा पिकासाठी रासायनिक खताची मात्रा ४० किलो नत्र, २० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश प्रति हेक्टर याप्रमाणे द्यावे. अर्धे नत्र व संपूर्ण पालाश व संपूर्ण स्फुरद मात्रा पेरणी करताना द्यावी व उरलेले अर्धे नत्र पेरणी नंतर एक महिन्याने द्यावे.

पाणी व्यवस्थापन :
या पिकाची लागवड कमी पावसाच्या भागात परंतु पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी करता येते. पावसाळी हंगामात पावसाचा जास्त दिवस खंड पडल्यास पाणी देणे अत्यंत आवश्यक आहे. पहिले पाणी फुटवे अवस्थेत, दुसरे फुलोरा येताना व तिसरे पाणी दाणे भरण्याच्या अवस्थेत देणे आवश्यक आहे. त्यामुळे दाणे चांगले भरून उत्पादनात वाढ होते.

पीक संरक्षण (किड व रोग व्यवस्थापन):
करपा (Blast) रोग :
‘राळा’ या पिकामध्ये कणसातील करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो. यामध्ये पानांवर दंडगोलाकार पांढरे ठिपके येतात व नंतर त्याचा आकार वाढून संपूर्ण पानावर, खोडावर पसरतात. त्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळत नाही. या रोगाच्या नियंत्रणासाठी थायरम किंवा कार्बेन्डॅझिम या बुरशीनाशकाची २ ग्रॅम/ किलो बियाणे याप्रमाणे पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी अथवा ०.१ % प्रमाणे फवारणी करावी.

खोडकिड : पेरणीनंतर पिक ६ आठवड्याचे असताना खोडकिडीचा प्रादुर्भाव सुरु होतो. या किडीच्या अळीद्वारे मुख्य खोडाचे नुकसान होऊन मर होते. त्यामुळे फुटव्यावर परिणाम होतो. सर्वाधिक नुकसान जुलै महिन्याच्या शेवटी व ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जाणवते. खोडकिड नियंत्रणासाठी प्रचलित किडनाशकाचा किंवा पद्धतीचा वापर करावा.

उपाययोजना: पावसाळा सुरु होताच ७ ते १० दिवसाच्या आत पेरणी करावी तसेच पेरणीकरीता जास्त बियाणे वापरावे.
आंतरमशागत :
आंतरमशागत करताना रोपांची प्रति एकरी योग्य संख्या ठेवण्यासाठी पेरणीनंतर २० दिवसांच्या आत विरळणी करावी. पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळात पिकाची वाढ संथ गतीने होत असल्याने तणे पिकाशी स्पर्धा करतात. त्यामुळे तणनियंत्रणासाठी एक कोळपणी करुन गरजेनुसार एक महिन्याच्या आत एक खुरपणी करावी.

काढणी व मळणी :
राळा पिकाच्या विविध वाणानुसार पक्वता कालावधी वेगळा असू शकतो. साधारणपणे ८० ते १०० दिवसात पीक काढणीस सुरुवात करावी. काढणीस उशीर झाल्यास कणसातील/बोंडातील दाणे झडण्याची शक्यता असते. पिकाची काढणी करताना कणसे/बोंडे विळ्याने कापून करावी. दोन-तीन दिवस उन्हात चांगली वाळल्यानंतर कणसे बडवून मळणी करावी. धान्य उन्हात चांगले वाळवून हवेशीर जागी साठवण करुन ठेवावे.

उत्पादन :
हे पीक लागवड करताना वापरण्यात येणाऱ्या निविष्ठा व सुधारित तंत्रज्ञानास उत्तम प्रतिसाद देणारे पिक आहे. या पिकापासून सरासरी हेक्टरी २० ते २५ क्विंटल प्रति हेक्टर धान्य उत्पादन घेता येते.

(संदर्भ:- अ.भा.स,नाचणी व तत्सम तृणधान्य संशोधन प्रकल्प, विभागीय कृषि संशोधन केंद्र, कोल्हापूर, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत)
(सदर माहिती, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन येथे प्रकाशित करण्यात आली आहे.)

English Summary: Millet Year 2023 Agricultural Advice Healthy Millet Crop Planting to Harvesting and Threshing Published on: 02 November 2023, 11:54 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters