सध्या राज्यात सर्वत्र कापसाला 11 ते 12 हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. मात्र, असे असले तरी या वाढीव दराचा फायदा नेमका कोणाला होतं आहे हा एक मोठा शोधाचा विषय बनला आहे.
खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली होती शिवाय गेल्या खरिपात दिवसेंदिवस मजूर टंचाईचा सामना करावा लागत असल्याने शेतकरी बांधवांनी कापूस लागवडीकडे पाठ फिरवली होती. यामुळे कापसाच्या उत्पादनात घट ही ठरलेलीच होती.
यामुळे कापूस हंगामाच्या सुरवातीपासूनच तेजीत बघायला मिळाला. सुरुवातीला कापसाला आठ ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत होता. त्यावेळी मिळत असलेला दर हा शेतकऱ्यांना समाधानकारक वाटल्याने अनेक शेतकरी बांधवांनी त्यावेळी कापसाची विक्री केली. काही बोटावर मोजण्याइतक्या आणि सदन शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक करून ठेवली होती.
यंदा कापसाच्या उत्पादनात घट झाली शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढली म्हणून सुरुवातीला आठ ते नऊ हजार रुपये अशा दराने विक्री होणारा कापूस सद्यस्थितीला 11 ते 12 हजार रुपये प्रति क्विंटल या दराने विक्री होत आहे.
यामुळे आता फारच तुरळक शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे उर्वरित कापूस हा तर व्यापाऱ्यांच्याच घशात आहे. यामुळे कापसाला मिळत असलेल्या वाढीव दराचा फायदा नेमका कोणाला होतोय असा जर विचार केला तर याचा फायदा बोटावर मोजण्याइतक्या सदन शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना अधिक होताना नजरेस पडत आहे. यामुळे कागदावर कापूस उत्पादक शेतकरी मालामाल होत असल्याचे चित्र जरी आपणास बघायला मिळत असेल तरीदेखील बांधावरची परिस्थिती बघता केवळ आणि केवळ व्यापारीच शेतकऱ्यांच्या कापसावर मालामाल होत आहे.
एकंदरीत कापसाच्या उत्पादनात घट झाली शेतकरी बांधवांना वाढीव दराने भरता आली म्हणजेच शेतकरी बांधवांना केवळ नुकसानीचा परतावा मिळाला. कापसाला खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा कापूस संपल्यानंतर उच्चांकी दर मिळाला. यामुळे कापसाला सध्या मिळत असलेल्या उच्चांकी दराचा फायदा व्यापारी जिनिंग आणि प्रेसिंग चालकांना होत आहे. आयजीच्या जीवावर बायजी उदार याप्रमाणे शेतकऱ्यांच्या जीवावर व्यापारी निश्चितच सोन्याच्या ताटात जेवण करणार आहे.
Share your comments