सध्या संपूर्ण राज्यात वाढत्या थकबाकीमुळे शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचा विजपुरवठा खंडीत करण्याचा महावितरणने धडाका सुरु केला आहे. नांदेड जिल्हा देखील याला अपवाद ठरलेला नाही जिल्ह्यातही सर्वत्र शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटा सुरू आहे. महावितरणच्या या धडाकेबाज कारवाईमुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसत असून, पाण्याअभावी पिके करत आहेत. शेतकऱ्यांच्या मते, महावितरणकडून कुठलीही पूर्वकल्पना न देता सर्रासपणे शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे.
महावितरणची ही कारवाई अन्यायी असल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला आहे. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मते, महावितरण ठराविक भागातीलचं शेतकऱ्यांचे शेती पंप वीज पुरवठा खंडीत करत आहे. महावितरण असा दुटप्पी व्यवहार का करीत आहे? असे देखील शेतकरी बांधवांनी या वेळी नमूद केले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या रब्बी हंगामात मका गहू आणि ज्वारी या मुख्य पिकांसमवेतचं भाजीपाला वर्गीय पिकांची देखील मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामातील गहू या पिकाला पाण्याची अजून एक पाळी फिरवणे आवश्यक आहे, गहू समवेतच अनेक रब्बी पिके अंतिम टप्प्यात आहेत तर अनेक भाजीपाला वर्गीय पिके अजूनही लहानच आहेत.
या दोन्ही अवस्थेतील पिकांना उन्हाचा कडाका वाढत असल्याने पाण्याची नितांत आवश्यकता आहे. मात्र, महावितरणच्या या कारवाईमुळे रब्बी हंगामातील पिकांना पाणी देणे अशक्य बनले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पिके करपून जातील अशी भीती शेतकऱ्यांना भेडसावत आहे. किनवट ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या घोटी, कनकवाडी, आंजी व सिरमेटी या एजी फीडरवरील कनेक्शन कट केले आहे. याच ठिकाणी महावितरणने कारवाई केली आहे, तालुक्यात दुसरीकडे महावितरणने कारवाई केली नसल्याचा आरोप या भागातील शेतकऱ्यांनी केला आहे. या भागातील शेतकऱ्यांनी हा आमच्यावर दिवसाढवळ्या अन्याय केला जात असल्याचा आरोप केला आहे.
शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, खरीप हंगामात किनवट मध्ये सर्वत्र अतिवृष्टीने हाहाकार माजवला होता, त्यामुळे खरिपातील पिकांसाठी आलेला उत्पादन खर्च काढणे देखील शक्य झाले नव्हते. मात्र असे असतानाही वीजबिल भरणा शेतकऱ्यांनी केला. आणि आता रब्बी हंगामात तालुका दुष्काळग्रस्त असल्याचे माहित असूनही पिके अंतिम टप्प्यात असताना वीज तोडणी करणे हे अनैतिक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. महावितरणच्या या कारवाईमुळे तेलंगाना सीमेवरील घोटी कवठाला आणि अंबाडी गावच्या अनेक शेतकऱ्यांनी आमचा समावेश सरळ तेलंगणात करून टाकावा असा टाहो फोडला आहे. महावितरण जरी नियमांवर बोट ठेवत ही कारवाई करत असेल तरीदेखील यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
Share your comments