राज्यात सर्वत्र सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरु झाली आहे. खरीप हंगामातील शेतमालाची आधीच बाजारपेठेत विक्री सुरू होती आता रब्बीतील शेतमाल देखील बाजारात दाखल होऊ लागल्याने आवक वाढल्याचे चित्र बघायला मिळत आहे. शेतकरी बांधवांना शेतमाल विक्रीसाठी शासनाने सुरू केलेल्या खरेदी केंद्राचा देखील लाभ होत आहे.
मात्र, राज्यातील मुख्य बाजार समित्या होळी सणाच्या पार्श्वभूमीवर सलग पाच दिवस बंद राहणार असल्याने बळीराजा धास्तावून गेला आहे. राज्यात दिवाळीच्या सणाला देखील बाजार समित्या बंद ठेवल्या गेल्या होत्या त्या वेळी शेतकऱ्यांना नानाविध अडचणींना सामोरे जावे लागले होते. आता होळीनिमित्त बाजार समित्या बंद असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या खरिपातील सोयाबीन, तूर आणि रब्बीमधील हरभराची मोठी आवक बघायला मिळत आहे.
होळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लासलगाव मालेगाव लातूर नासिक सोलापूर इत्यादी कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार आहेत. दरवर्षी होळी सणाला कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद असतात. किती दिवस बंद ठेवायची याचा निर्णय बाजार समिती प्रशासन घेत असते त्यानुसार राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी दोन ते पाच दिवस बाजार समितीचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर जरी बाजार समित्या बंद असल्या तरीदेखील यामुळे बळीराजाची मोठी कैफियत होणार असल्याचे सांगितले जात आहे.
मित्रांनो लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती सलग पाच दिवस बंद राहणार आहे मात्र, या बाजार समितीत भाजीपाला खरेदी विक्री सुरू राहणार आहे. आशियातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ लासलगाव बाजार पेठ देखील होळीनिमित्त दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. कसमादे पट्ट्यातील प्रमुख बाजारपेठ मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती देखील होळीनिमित्त पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मात्र कांद्याचे व्यवहार सुरळीत सुरू राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. एकंदरीत होळीच्या सणानिमित्त बाजार समिती प्रशासनाने स्थानिक पातळीवर निर्णय घेतला आहे. यामुळे शेतमालाचे दर काय राहतील हे विशेष पाहण्यासारखे आहे. एकंदरीत होळीच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती प्रशासनाचा हा निर्णय शेतकरी राजासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो.
हेही वाचा:-साहेब! वीजपुरवठा सुरळीत सुरु झाला खरं; मात्र, रब्बी पिके घेतील का पुन्हा उभारी?
हेही वाचा:-महत्वाची बातमी! कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार; उपमुख्यमंत्री अजित दादांनी केले स्पष्ट
Share your comments