Pune News : दसरा आणि दिवाळीच्या सणात झेंडूच्या फुलांना बाजारात चांगली मागणी असते. पण यंदा मात्र झेंडू उत्पादक शेतकऱ्यांवर दराचे संकट ओढावले आहे. बाजारात झेंडूची आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. नाशिकमध्ये केवळ १० ते १५ रुपये असा भाव आहे. तर पुण्यात जिल्ह्यात देखील झेंडूच्या फुलांची हिच स्थिती आहे.
दसरा आणि दिवाळी सण गोड होईल या आशेने शेतकरी झेंडूची लागवड करतात. मात्र यंदा जिल्ह्यातील बाजारात झेंडूची आवक जास्त असल्याने दरात घसरण झाली आहे. नाशिकच्या मनमाड बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावात जवळपास दिडशे पेक्षा अधिक वाहनांच्या झेंडूच्या फुलांच्या आवक झाली होती.
पुण्यातील मार्केटयार्डात देखील फुलांची मोठी आवक झाली आहे. पुणे जिल्ह्यातील जवळपास सर्व तालुक्यातून शेतकऱ्यांनी फुले विक्रीसाठी आणली आहेत. बाजारात फुलांची आवक वाढली आहे. मात्र फुलांना दर मिळत नाही. यामुळे शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.
बाजारात झेंडूच्या फुलांना १० ते १५ रुपये कवडीमोल भाव मिळाला आहे. झेंडुंच्या फुलांमुळे दसरा दिवाळी गोड होईल, ही अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र फुलांना भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले आहे.
सध्या नवरात्री उत्सव सुरु आहे. यामुळे फुलांना बाजारात मागणी आहे पण दर नाही. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर तसेच पावसामुळं झालेलं नुकसान यामुळे फुलांच्या दरात यंदा चांगलीच वाढ होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र सध्या फुलांच्या दराबाबत बाजारात तसे झाले नाही.
Share your comments