मराठवाड्याचा पाणी प्रश्न अखेर मिटला आहे. काल रात्री उशीरा नाशिकच्या दारणा धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या पथकाच्या उपस्थितीत पाणी सोडण्यात आले. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जायकवाडीसाठी 8.6 टीएमसी इतके पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानूसार दारणा धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आले आहे.
मराठवाड्यात कमी पाऊस झाल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच जायकवाडी धरणात फक्त 47 टक्के पाणीसाठा उरलेला असून सध्या मराठवाड्यात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर प्रशासनाच्या बैठकीत वरील धरणातून जायकवाडीत 8.603 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ज्यात नाशिक, नगरमधील गंगापूर, गोदावरी- दारणा, मुळा, प्रवरा, निळवंडे धरणातून पाणी सोडले जाणार होते. मात्र नगर आणि नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व साखर कारखानदारांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला.
दरम्यान, पाटबंधारे विकास महामंडळानी 8.6 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश देऊनही नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांचे पाणी जायकवाडी धरणात सोडण्यात येत नसल्याने मराठवाडा पाणी जन आंदोलन समितीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरात गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. त्यासोबतच पाण्यासाठी न्यायालयीन लढाई देखील झाली. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार मुळा (मांडओहोळ व मुळा) प्रकल्पातून 2.10, प्रवरा (भंडारदरा, निळवंडे, आढळा, भोजापूर) प्रकल्पातून 3.36, गंगापूर धरणातून (गोदावरी, काश्यपी, गौतमी गोदावरी), 0.5, गोदावरी दारणा (आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी) प्रकल्पातून 2.643 टीएमसी असे एकूण 8.603 टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्यात येणार आहे.
Share your comments