मराठवाड्यात पाणी प्रश्न चांगलाच पेटला आहे. जायकवाडी धरणात अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील धरणातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलन केलं आहे. सकाळी 11 वाजल्यापासून जालना रोडवर हे रास्ता रोको आंदोलन सुरु होते. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलिसांनी राजेश टोपे आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्यासह एकूण 50 जणांना ताब्यात घेतले आहे.
पाटबंधारे विकास महामंडळानी 8.6 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश देऊनही नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांचे पाणी जायकवाडी धरणात सोडण्यात येत नसल्याने मराठवाडा पाणी प्रश्न पुन्हा पेटला आहे. न्यायालयाने आदेश देवूनही जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विलंब होत आहे. त्यामूळे मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळत नसल्याने मराठवाडा पाणी जन आंदोलन समितीच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगर शहरात जनआंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्यानुसार आज सकाळी 11 वाजता गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर या आंदोलनाला सुरवात झाली.
जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विलंब करणाऱ्या शासनाच्या विरोधात सर्व पक्षीय नेत्यांनी छत्रपती संभाजीनगर-जालना रोडवर रास्ता रोको सुरु केले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणवर वाहतूक कोंडी होवून काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. या आंदोलनात माजी मंत्री राजेश टोपे, अर्जुन खोतकर, माजी मंत्री अनिल पटेल, आमदार संजय शिरसाट, माजी आमदार कल्याण काळे हजर होते. हे आंदोलन तीव्र होत चालल्याने पोलिसांनी राजेश टोपे आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्यासह एकूण 50 जणांना ताब्यात घेतले आहे.
Share your comments