1. बातम्या

नदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळमुक्त करू

नवी दिल्ली: केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने नदी जोड प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करून मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र पुढील पाच वर्षात दुष्काळमुक्त करु असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.

KJ Staff
KJ Staff


नवी दिल्ली:
केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने नदी जोड प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करून मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र पुढील पाच वर्षात दुष्काळमुक्त करु असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला. येथील श्रमशक्ती भवनात आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेतली यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन उपस्थित होते. या बैठकीनंतर श्री. फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली.

राज्यातील दुष्काळ निवारणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये नदी जोड प्रकल्पाची महत्त्वपूर्ण भूमिका असून केंद्र आणि राज्य शासनाच्या समन्वयातून गोदावरी खोऱ्यात जास्तीतजास्त पाणी आणण्याचे नियोजन आहे. यासंदर्भात आज केंद्रीय जलशक्तीमंत्र्यांना माहिती दिली असून लवकरच या संदर्भात सविस्तर सादरीकरणही देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यात पाणी आणून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करता येणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

केंद्र शासनाने दुष्काळ निवारणासाठी गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राला उत्तम सहकार्य केले असून येत्या काळातही केंद्र शासनाच्या सहाय्याने राज्यात दुष्काळ निवारणासाठी ठोस पावले उचलण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीतही पाणी, दुष्काळ आणि शेती विषयक प्रश्नांवर चर्चा होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

नीती आयोगाच्या बैठकीत सहभाग घेण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज जलशक्तीमंत्री गजेंद्र शेखावत यांच्यासह पेट्रोलियम व गॅस तथा स्टीलमंत्री धर्मेद्र प्रधान आणि गृहनिर्माण व शहरी विकास, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांचीही भेट घेतली.

English Summary: Marathwada make Drought free by river Interlinking Project Published on: 16 June 2019, 07:33 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters