Beed News : राज्यात मराठा आरक्षणासाठी मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. राज्यातील बहुतांश गावात नेत्यांना गावबंदी देखील करण्यात आली आहे. बीडमध्ये मोठ्या प्रमाणात या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. या दरम्यान आमदार प्रकाश सोळुंके यांच्या घरावर दगडफेक करुन त्यांच्या बंगल्याला आग लावण्याची घटना घडली आहे. यावर आमदार सोळुंके यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केले आहे. माझ्या घरावर हल्ले करणारे काही समाजकंटक होते. त्यात स्थानिक माफिया मिसळले होते. घर जाळल्याच्या घटनेनंतर मराठा कार्यकर्त्यांनीच माझा जीव वाचवला, असंही सोळुंके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
यावेळी सोळुंके म्हणाले की, माझ्या घरावर हल्ला करणारे कार्यकर्ते हे बिगर मराठा होते. ते आपल्या राजकीय विरोधकांचे कार्यकर्ते होते, असा दावा प्रकाश सोळंके यांनी केला आहे. विशेष म्हणजे या २५० ते ३०० समाजकंटकांपासून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनीच आपल्याला वाचवलं. त्यांच्यामुळेच आपला जीव वाचला, असंही सोळुंके यांनी म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले की, माझ्या घरावर ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर कारवाई केली जावी. त्या दिवसांचे सर्व सीसीटीव्ही फुटेज मी पोलिसांकडे दिले आहेत. घरावर हल्ला करणाऱ्यांमध्ये अनेक समाजकंटकांचा समावेश होता. समाजकंटकांनी दगडफेक करत माझे घर जाळले आाहे. तसंच त्यांच्यासोबत पेट्रोल बॉम्ब देखील होते. माझ्या घरावर झालेल्या हल्ल्याचा कट कुठे झाला? यात कुणाकुणाच समावेश आहे? याबाबत सगळी माहिती पोलिसांना दिली होती. मात्र हल्ल्यावेळी पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. असा गंभीर आरोपही यावेळी सोळुंके यांनी केला आहे.
Share your comments