राज्यात मराठा आंदोलन उग्र होत चालले असून बीड जिल्ह्यात मराठा आंदोलकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक केली. त्याचबरोबर सोळंकें यांच्या घराबाहेर असलेल्या गाडीचीही जाळपोळ करण्यात आली. प्रकाश सोळंके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल टिप्पणी केल्यामुळे आंदोलक संतापले होते, त्यामुळे दगडफेक करत तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे.
या दगडफेकीमध्ये घर आणि गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या दगडफेकीमुळे परिसरामध्ये सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी माजलगाव आणि वडवणी तालुका बंदची हाक देण्यात आलीय. वडवणी तालुक्यातील सर्व कामकाज बंद ठेवण्याचं आवाहन सकल मराठा समाजाकडून करण्यात आलं होतं. मात्र काही आंदोलकांनी प्रकाश सोळंके यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करत दगडफेक केली.
या घटनेबाबात प्रकाश सोळंके यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. मीही मराठा समाजाचा आमदार असून माझाही मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा आहे. कोणीतरी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यावर मराठा समाजाने विश्वास ठेवू नये, शांतता राखावी असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केलं आहे.
Share your comments