मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेला 40 दिवसांचा अल्टिमेटम संपला आहे. तरी अजूनही मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामूळे मनोज जरांगे पाटील हे आज अंतरवली सराटीत आमरण उपोषणाला बसणार आहेत. यावेळी अन्नपाणी आणि औषधेही घेणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेत मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी घोषणा केली आहे.
जरांगे पाटील काय म्हणाले -
मुख्यमंत्र्यांनी शिवरायांची शपथ घेऊन आरक्षण देण्याचं आश्वासन केलं. मी कार्यक्रमात असल्याने पाहिलं नाही. आमचा दिवसरात्र कार्यक्रम सुरु आहे. पण त्यांनी छत्रपतींची शपथ घेतली असेल तर ही समाजाच्या दृष्टीने चांगली बाब आहे. आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण हवं आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या शब्दांचा मान ठेवला. आम्ही ४० दिवस दिले. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण देवून आमचा सन्मान करावा. कारण ते शब्दाला पक्के आहेत, अशी मराठा समाजात भावना झाली आहे. त्यांनी त्या शब्दाला जागावं. त्यांनी आता आरक्षण द्यावं. आमच्या पोराबोळांनी असे काय पाप केलयं की त्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळत नाही आहे. आम्ही मराठे आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाहीत असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.
येत्या 28 तारखेला आंदोलनाची पुढची दिशा सांगणार असल्याचंही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर आजपासून मराठा समाजही उपोषण करणार असून गावागावातील सर्कलवर मराठा समाज एकजूट होवून साखळी उपोषण करणार आहे.काही गावांनी तर राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांना गावबंदी केली आहे. तसेच मराठा आंदोलक गावागावात कँडलमार्चही काढणार आहेत. काही गावांनी तर राज्यातील सर्व पक्षीय पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे.
Share your comments