Solapur News : मराठा आंदोलनासाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील हा दौरा आहे. २३ नोव्हेंबरपर्यंत मनोज जरांगेंच्या यांच्या महाराष्ट्रभरातील दौऱ्याचं नियोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा त्यांच्या सभांचा धडाका सुरु होणार आहे. पहिली सभा आज सोलपुरातील वांगी येथे पार पडणार आहे.
दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील वांगी नंबर १ या ठिकाणी जरांगे पाटील यांची भव्य सभा होणार आहे. तसंच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी सरकारला २४ डिसेंबपर्यंत मुदत दिली आहे. त्यापार्श्वभूमीवर आजच्या सभेत जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथे मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. सभेच्या ठिकाणी रांगोळी व बॅनर लावून नागरिक सज्ज आहेत. राज्यासह वाशी शहरात देखील मराठा समाजाने मंत्री आमदार नेत्यांना शहरप्रवेश बंदी केली आहे.
यावेळी मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, “मराठा समाजाचा आशिर्वाद घेण्यासाठी निघालोय. कुणबी नोंदी सापडत असल्याने मराठा समाजात उत्साह निर्माण झालाय, मराठा आरक्षण मिळणार, लेकरा बाळांच कल्याण होणार हा विश्वास आता समाजाला वाटतोय” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
दरम्यान, आज OBC समाजाकडून मनोज जरांगे यांचा सत्कार होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या वाशी येथील सभेची तयारी पूर्ण झाली आहे. जरांगे पाटील यांच्यावर माळी समाजाच्या वतीने १०० जेसीबीतून फुलांची उधळण केली जाणार आहे. १ टनाचा हार देखील त्यांना घातला जाणार आहे.
Share your comments