परभणी: कृषी क्षेत्रातील अनेक कंपन्याना एका बाजुस कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे, तर अनेक युवक रोजगारापासुन दुर आहेत. त्यामुळे ग्रामीण युवकांना कृषी कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्याची गरज आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी एकत्रित येऊन उत्पादक कंपन्या स्थापन करित आहेत, परंतु तांत्रिक पाठबळ व मार्गदर्शनाच्या अभावामुळे या कंपन्या अकार्यक्षम होत आहेत. या कंपन्यासाठी प्रशिक्षित बेरोजगार युवकांनी सल्लागार म्हणुन कार्य केल्यास निश्चितच शेतकरी उत्पादक कंपन्या चांगल्या पध्दतीने विकसित होतील, व शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होईल, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.
आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधुन दिनांक 15 जुलै रोजी वैयक्तिक कृषी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व सिमॅसिस लर्निंग एलएलपीस यांच्यात सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सदरिल प्रशिक्षण केंद्र शासनाची पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि राज्य शासनाच्या छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास व उद्योगजकता अभियांनांतर्गत राबविण्यात येणार असुन या प्रशिक्षण उपक्रमाबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ. प्रदिप इंगोले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, जेष्ठ पत्रकार श्री. दयानंद माने, सिमॅसिस लर्निंगचे सहाय्यक सरव्यवस्थापक श्री. अमोल बिरारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगूरू डॉ. अशोक ढवण पुढे म्हणाले की, कृषी कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातुन बेरोजगार युवकांना रोजगारासाठी दिशा मिळेल, अनुभवजन्य ग्रामीण मनुष्य निर्मीती होईल. कौशल्यावर आधारित उत्पादनक्षम व्यवस्था निर्माण होऊन ग्रामीण भागात सामाजिक समृध्दी येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांनी मार्गदर्शनात सर्व कृषी विज्ञान केंद्रे, घटक व संलग्न महाविद्यालय व कृषी तंत्र निकेतन यांनी वैयक्तिक कृषी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम योग्य पध्दतीने राबविण्याबाबत आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. अमोल बिरारी यांनी केले तर श्री. उदय वाईकर यांनी सुत्रसंचालन केले. कार्यक्रमास विद्यापीठांतर्गत असलेल्या घटक व संलग्न महाविद्यालये, कृषी विज्ञान केंद्रे, कृषी तंत्र विद्यालय आदींचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानात राज्यातील पन्नास हजार ग्रामीण बेरोजगार तरूणांना मोफत प्रशिक्षण देऊन शेतीतील महत्वाच्या घटकांविषयी कौशल्य देण्याचा कार्यक्रम हा राज्य शासनाचा हा अत्यंत महत्वाकांक्षी उपक्रम आहे. ग्रामीण तरूणांना रोजगाराभिमुख बनविणे प्रमुख उदीष्ट असुन ग्रामीण तरूणांना शेतीविषयक नवनवीन घटकांविषयी प्रशिक्षण देऊन त्यांचे ज्ञान व कौशल्य वाढविणे व त्यातुन त्यांना रोजगाराच्या किंवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध देण्याचा प्रयत्न होणार आहे.
यात सेंद्रिय पिक उत्पादक, कृषी विस्तार सेवा प्रदाता, गुणवत्ता बियाणे उत्पादक, बीज प्रक्रिया कामगार, सुक्ष्म सिंचन तंत्रज्ञ, हरितगृह चालक, ट्रॅक्टर चालक, दुग्ध उत्पादक व उद्योजक व छोटे कुक्कुटपालक आदी विषयात दोन महिनाचा पुर्णवेळ प्रशिक्षण कार्यक्रम विद्यापीठातंर्गत असलेल्या घटक व संलग्न महाविद्यालये, कृषी विज्ञान केंद्रे, कृषी तंत्र विद्यालय आदींच्या माध्यमातुन सिमॅसेस लर्निंग एलएलपीस राबविणार आहे.
Share your comments