डॉ. राजरतन खंदारे, प्रा. प्रज्ञा खिल्लारे
महाराष्ट्रात नवीन लष्करी अळीचा प्रादुर्भाव मक्यासह ज्वारी, ऊस व कापूस या पिकावर देखील मागील काही वर्षांपासून दिसून येत आहे. ही कीड कमी कालावधीत पिकाचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकते. या कीडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक किड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा.
ओळख व जीवनक्रम : या किडीच्या अंडी, अळी, कोष व पतंग या चार अवस्था आहेत.
*अंडी : मादी पानाच्या खालील बाजूस 100-200 अंडी घालते, ही अंडीपुंज केसाळ आवरणाने झाकलेली असतात. एक मादी 800 ते 1200 अंडी घालते. अंडी मळकट पांढरी ते करडया रंगाची व घुमटाच्या आकाराची असतात. अंडयातून 2 ते 3 दिवसात अळी बाहेर पडते.
*अळी : ही अवस्था सहा अळी अवस्थांमधून पूर्ण होते. अळीचा रंग फिकट हिरवा ते जवळपास काळा असतो. पाठीवर फिकट पिवळया रंगाच्या तीन रेषा असतात. डोक्यावर उलटया इंग्रजी ‘Y’ अक्षरासारखे चिन्ह असते तर कडेने लालसर तपकिरी पट्टा असतो. तसेच शरीरावर काळे ठिपके असतात. मागच्या बाजुने दुस–या वलयावर चौरसाच्या आकारात चार काळे ठिपके असतात. अळीची वाढ 14 ते 30 दिवसात पूर्ण होते.
*कोष : पुर्ण वाढ झालेली अळी 6 ते 8 सेंटिमीटर जमिनीत जावुन मातीचे कोषावस्थेत जाते. कोषावस्था 9 ते 12 दिवसात पुर्ण.
*पतंग : नर पतंग राखाडी ते तपकिरी पुढील पंखाच्या वरच्या कडेला त्रिकोणी आकारात पांढरा ठिपका, मादी पतंगाचे पुढचे पंख राखाडी असते नर व मादीमध्ये मागील पंख सोनेरी पांढ-या रंगाचे असते पतंग अवस्था 4 ते 6 दिवसांची. या अळीचा एक जीवनक्रम 32 ते 46 दिवसात पुर्ण होतो.
प्रमुख यजमान वनस्पती :
*बहुभक्षी कीड (186 वनस्पतीवर उपजिविका) मका, ज्वारी, ऊस, भात, गहू इ. तृणधान्ये पिकांना प्राधान्य. चवळी, भुईमूग, सोयाबीन, कापूस, बटाटा यावरर्ही नोंद आहे.
नुकसानीचा प्रकार :
रोपावस्थेत पहिल्या दोन अवस्थेतील अळया पानाचा हिरवा भाग खरवडून खातात त्यामुळे पानावर पांढरे चटटे दिसतात. नंतरच्या अवस्थेतील अळया पोंग्यामध्ये प्रवेश करुन पाने खाण्यास सुरवात करतात. त्यामुळे पाने कुरतडल्यासारखी दिसतात. अळी पानाच्या खाली चिकट धाग्याच्या साहयाने लोंबकळते व वा-याने उडून नजिकच्या झाडावर पोहोचते त्याच “Balloning’’ असे म्हणतात. पानांना छिद्रे व पोंग्यामध्ये अळीची विष्ठा ही चिन्हे या अळीच्या प्रादुर्भावाची आहेत. तुरा व कणीस भरण्याच्या अवस्थेत अधिक आथीर्क नुकसान होते. अळी कणसात दाण्यांवर उपजीविका करते. या किडीच्या प्रादुर्भावामुळे जवळपास 30 ते 60 टक्क्यापर्यंत उत्पादनात घट येऊ शकते.
शेतात निरीक्षण कसे करावे :
शेताचे दररोज निरीक्षण करावे, बाहेरील बाजुच्या 3 ते 4 ओळी सोडून शेतातून इंग्रजी (W किंवा X)’ आकारात चालावे, या आकारातील प्रत्येक ओळीतील पाच अशी एकुण वीस झाडे निवडावीत. त्यापैकी किती झाडांवर प्रादुर्भाव आहे याची नोंद घ्यावी. वीस झाडापैकी दोन झाडे प्रादुर्भावात असल्यास, नुकसान पातळी 10 टक्के आहे असे समजावे.
पिकाची अवस्था व कालावधी - आर्थिक नुकसानीची पातळी
1) रोपावस्था ते सुरुवातीची पोंग्याची अवस्था (उगवणीनंतर 3 ते 4 आठवडे) - 5% प्रादुर्भावग्रस्त झाडे
2) मध्यम पोंग्याची अवस्था (5 ते 6 आठवडे) - 10% प्रादुर्भावग्रस्त झाडे
3) शेवटची पोंग्याची अवस्था (7 आठवडे) - 20% प्रादुर्भावग्रस्त झाडे
4) तुऱ्याची अवस्था व त्यानंतर (8 आठवड्यानंतर) - फवारणी टाळावी. पण 10% प्रादुर्भावग्रस्त कणसे असल्यास फवारणी करावी.
एकात्मिक व्यवस्थापन :
*मशागतीय पध्दती
•जमिनीची खोल नांगरट करावी मागील हंगामातील पिकांच्या अवशेषाची विल्हेवाट लावावी
•पेरणीपूर्व 200 किलो प्रति एकरी निंबोळी पेंडीचा वापर करावा.
•एकाच वेळी मका पिकाची पेरणी करावी, टप्याटप्याने पेरणी टाळावी.
•मक्यामध्ये मूग किंवा उडीद यांचे आंतरपीक घ्यावे. त्यामुळे मित्रकीटकांचे संवर्धन होईल.
•पिकाची फेरपालट करावी वारंवार एकाच शेतात मका पीक घेण्याचे टाळावे.
•मका पिकाभोवती नेपियर गवताच्या 3 ते 4 ओळी लावावे. हे गवत सापळा पीक म्हणून कार्य करते.
•मित्र कीटकांना आकर्षित करण्यासाठी शेताच्या बांधावर झेंडू, कोथिंबीर, सूर्यफूल व तीळ या पिकाची लागवड करावी.
•रासायनिक खताचा अतिरेकी वापर टाळावा.
*भौतिक पद्धती
•पीक 30 दिवसापर्यंतचे असल्यास बारीक वाळू किंवा बारीक वाळू व चून्याचे 9:1 प्रमाण करून पोंग्यात टाकावे.
*यांत्रिक पध्दती
•मका पेरणीनंतर लगेच एकरी दहा पक्षी थांबे उभारावेत.
•पानांवर दिसणारे अंडीपुंज व सुरवातीच्या अवस्थेतील मोठ्या अळया गोळा करुन नष्ट कराव्यात.
•किडीच्या सर्वेक्षणासाठी सुरवातीपासून एकरी पाच कामगंध सापळे लावावेत. मोठ्या प्रमाणात नर पतंग पकडण्यासाठी 15 कामगंध सापळे प्रति एकरी लावावेत.
*जैवीक पध्दत
•किडींचे नैसर्गिक शत्रू जसे परभक्षी (ढालकिडा, मोठ्या डोळ्याचा ढेकूण इ.) व परोपजीवी कीटक (ट्रायकोग्रामा, टिलोनेमस, कॅम्पोलेटीस इ.) यांचे संवर्धन करावे. यासाठी आंतरपिके व शोभिवंत फुलांची झाडे लावावी.
•ट्रायकोग्रामा प्रीटीओसम किंवा टीलेनोमस रेमस यांनी परोपजीवीग्रस्त 50000 अंडी प्रति एकर एक आठवड्याच्या अंतराने 3 वेळा किंवा कामगंध सापळ्यामध्ये 3 पतंग / सापळा आढळून आल्यास शेतात सोडावे.
•रोपावस्था ते सुरुवातीची पोंग्याची अवस्था या कालावधीत 5% प्रादुर्भावग्रस्त झाडे आणि शेवटी 10% प्रादुर्भावग्रस्त कणसे आढळून आल्यास उपयुक्त बुरशी व जिवाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करावी या मध्ये नोमोरिया रिलाई 50 ग्रॅम किंवा मेटार्हाजिएम ऍनिसोपल्ली 50 ग्रॅम किंवा बॅसिलस थुरिन्जिएन्सिस कुर्सटाकी प्रजाती 20 ग्रॅम 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
•वरील जैविक कीटकनाशके पीक 15 ते 25 दिवसाचे झाल्यास पोंग्यामध्ये द्रावण जाईल अशाप्रकारे फवारणी करावी. त्यानंतर 10 दिवसाच्या अंतराने 1 ते 2 फवारणी करावी.
*रासायनिक पध्दती
•स्यानट्रानिलीप्रोल 19.8% + थायामिथॉक्झाम 19.8% या मिश्र कीटकनाशकाची 4 मिली प्रती किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
•ज्वारीवरील खोड माशीच्या नियंत्रनासाठी : क्विनालफॉस 25 ई.सी. 30 मिली प्रति 10 लिटर पाणी फवारणी करावी
नोट :
-रासायनिक किटकनाशकाची फवारणी चारा पिकावर करु नये.
-एकाच रासायनिक किटकनाशकाची फ़वारणी हंगामात दोन पेक्षा जास्त वेळा करु नये.
-तु-याची अवस्था व त्यानंतर फवारणी टाळावी.
-शेतात कीटकनाशकाचे द्रावण तयार करतानी व फवारणी करताना चष्मा, हातमोज़े व तोंडावर. मास्कचा वापर करावा तसेच घुटका, तंबाखु खाऊ नये व बीडी पिऊ नये.
लेखक - डॉ. राजरतन खंदारे, संशोधन सहयोगी, कृषि कीटकशास्त्र विभाग, वनामकृवि, परभणी
प्रा. प्रज्ञा खिल्लारे, सहायक प्राध्यापक, कृषि महाविद्यालय, पाथरी
Share your comments