मालेगाव : राज्यासह देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून या विषाणूच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या दरम्यान जिवाश्यक वस्तूंचे दुकाने चालू राहितील, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. शेतीसंबंधित व्यवसायही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्याच पार्श्वभुमीवर राज्यातील काही बाजार समित्या आणि भाजीपाला मार्केट चालू करण्यात आले आहेत. मात्र मालेगावातील परिस्थिती वेगळी आहे.
मालेगाव शहरातील भाजीपाला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असतो. ग्राहक आणि किरकोळ विक्रेत्यांची प्रचंड गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर मार्केट कमिटीने सर्व आडत्यांना बाजार बंद ठेवण्याचे निर्देश दिले असून बाजार बंद करण्यात आला आहे. काही प्रमाणात विक्रीसाठी येणारा शेतमाल बाजारात न येता बाहेर विकला जात आहे. परंतु बाहेर किरकोळ विक्रेत्यांकडून विकाला जाणाऱ्या भाजीपाला हा अधिक दराने विकला जात असल्याने ग्राहकांची लूट होत आहे. मालेगाव बाजार समितीतील भाजीपाला आडत(एजंट) दिपक भदाणे म्हणतात की, 'मालेगाव मार्केट मोठे असून येथे ८८ आडत पेढ्य़ा आहेत. मालेगाव मार्केटमधून टमाटे ३०० ते ४०० टन, आणि ८ ते १० टन मिरची विक्री होत असते. मार्केटमध्ये विक्रेते आणि ग्राहकांची मोठी गर्दी अधिक होत असते. यामुळे कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी मार्केट बंद करण्यात आले', अशी माहिती भदाणे यांनी दिली. भदाणे हे दररोज २ टन भेंड्या, ३ टन कांदे, २ टन मिरची, २ दोन बटाट्यासह इतर भाज्यांची विक्री करतात.
पण सध्या कोरोना व्हायरसमुळे याची अवाक कमी झाली आहे. शेतकऱ्यांना रोकड पैसा द्यावा लागतो. त्यामुळे बाजारात व्यवहार कमी होत आहेत. मात्र होलसेल विक्रीत भाज्यांचे दर स्थिर आहेत. पण किरकोळ विक्री करणारे ग्राहकांना लूटत असल्याचे भदाणे यांनी सांगितले. शेवग्याचे आडत(एजंट) दर्शन लोणारी हे म्हणतात की, आमच्याकडे दिवसाला २० टन शेवग्याची आवक होत असते. परंतु आता मार्केट बंद असल्य़ाने शेतकऱ्यांकडून येणाऱ्या मालाचा पुरवठा कमी झाला आहे. दरम्यान राज्यातील इतर ठिकाणी आठवडे बाजार चालू करण्यात आले आहेत. औरंगाबाद शहारातील बंद करण्यात आलेला आठवडे बाजार सोशल डिस्टंस ठेवून सुरू करण्यात आला आहे. कोरोनाने सर्वच उद्योगांना आपल्या विळख्यात घेतले आहे. शेती उद्योगालाही त्यांचा फटका बसला आहे. देशातील काही बाजारपेठांमध्ये शेतमालांची आवक घटली असून तेथील कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. दिल्लीतील आझादपूर मंडईमधील पुरवठा कमी झाला आहे, यामुळे बाजारात आलेल्या भाज्यांचे दर वाढले आहेत.
Share your comments