सिंधुदुर्ग: मलेशियन डॉर्फ ही नारळाची प्रजाती अतिशय उपयुक्त असण्याबरोबरच जिल्ह्यात या प्रजातीच्या रोपांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. तथापि सध्या पालघर जिल्ह्यातून ही रोपे आणावी लागतात व शेतकऱ्यांना यासाठी खूप खर्च येतो. यासाठीच यंदाच्या वर्षीच सिंधुदुर्गात मलेशियन डॉर्फ प्रजातीची नारळ रोपे उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यात नर्सरी उभारली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे बोलताना दिली.
सावंतवाडी येथील बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित जागतिक नारळ दिन कार्यक्रमात पालकमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी सिंधुदुर्ग श्रीफळ असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश गवस, कोषाध्यक्ष रामानंद शिरोडकर, नारळ संशोधक डॉ. दिलीप नागवेकर, नारळ विकास बोर्डाचे उपसंचालक प्रमोद कुरियन उपस्थित होते.
नारळाला श्रीफळ असे संबोधले जाते. नारळापासून निरा, सोडणापासून काथ्या अशी अनेक उत्पादने हाती येतात असे सांगून पालकमंत्री श्री केसरकर म्हणाले की, सिंधुदुर्ग नारळाच्या उत्पादनात व लागवडीत अग्रेसर असला तरी आता जुन्या नारळ बागांचे पुनरुज्जीवन करणे क्रमप्राप्त आहे. नवीन नारळ प्रजातींच्या लागवडीवर भर देणे गरजेचे आहे. नारळ बागात आंतरपीक घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. नारळ बागायतदारांनी सूक्ष्म सिंचनाद्वारे पाणी पद्धतीचा वापर करुन आंतरपिकाबरोबरच नारळाच्या उत्पादन वाढीवर भर देणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांबरोबरच नारळ विकास बोर्डाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रवृत्त होण्याची गरज आहे.
रामानंद शिरोडकर यावेळी बोलताना म्हणाले की, 2 सप्टेंबर 1969 साली आशिया खंडामध्ये नारळ विकासासाठी संघटना निर्माण करण्यात आली. या संघटनेचा भारत हा संस्थापक देश आहे. यासाठी दरवर्षी विश्वात 2 सप्टेंबर हा दिवस जागतिक नारळ दिन म्हणून साजरा केल जातो. ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्गात 12 ठिकाणी काथ्या प्रक्रिया उद्योग सुरू झाले आहेत. हे काथ्या प्रक्रिया उद्योग सक्षमपणे सुरू राहण्यासाठी नारळ बागायतदारांनी सोडण पुरवठा मोठ्या प्रमाणावर करायला हवा. नारळ विकास बोर्डाने जुन्या नारळ बागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी विकास योजना राबविण्याची आवश्यकता आहे.
यावेळी सिंधुदुर्ग नारळ उत्पादक संघाचे अध्यक्ष सुरेश गवस यांनी निरा विक्री परवाना शासनाने लवकरात लवकर द्यावा अशी मागणी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना डॉ. दिलीप नागवेकर यांनी नारळ लागवड, जोपासना, देखभाल, औषध मात्रा, खत नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली. प्रारंभी श्री. प्रमोद कुरियन यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन नारळ विकास बोर्डाच्या योजनांची माहिती दिली. शेवटी शरद आगलावे यांनी आभार मानले.
Share your comments