सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती अशी झाली आहे की इकडे आड तिकडे विहीर असंच म्हणावं लागेल. अगोदरच निसर्गाच्या लहरीपणामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकरी कसेतरी अडचणीतून मार्ग काढत शेती करतात परंतु काही प्रशासनातील घटक देखील शेतकऱ्यांच्या लुटीसाठीच बसले आहेत की काय असा प्रश्न निर्माण होतो.
असाच एक प्रकार पंढरपूर व माळशिरस तालुक्यामध्ये उघडकीस आला आहे. याबद्दल सविस्तर माहिती अशी की, येथील एका बँक अधिकाऱ्याने ठिबक संच विक्रेत्याच्या मदतीने शेतकऱ्यांच्या नावे ठिबक संचाचे बोगस कर्ज प्रकरणे केली व त्याद्वारे कोट्यावधी रुपये लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबतची तक्रार रयत क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष राहुल बिडवे व शेतकरी यांनी मिळून अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकार्यांकडे केली आहे. या दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी यासाठी शेतकऱ्यांनी बँकेच्या दारात बोंबाबोंब आंदोलन केले.
नेमके काय आहे हे प्रकरण?
याबाबत मिळालेली माहिती अशी की माळशिरस तालुक्यातील श्रीपुर येथील बँक ऑफ महाराष्ट्रा च्या शाखेत तत्कालीन शाखा अधिकारी यांनी ठिबक संच विक्रेता राहुल पांढरे यांच्या साथीने पंढरपूर तालुक्यातील नांदोरे, नेमतवाडी, पेहे व माळशिरस तालुक्यातील नेवरे, जांबुड इत्यादी गावातील सुमारे शंभरपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या नावे बोगस ठिबक सिंचन संच खरेदीचे प्रकरण करून जवळपास अडीच ते तीन कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचाप्रकार समोर आला आहे.या प्रकरणानंतर तब्बल पाच वर्षांनंतर बँकेने थकीत कर्जाची रक्कम वसुलीसाठी नोटीस दिल्यानंतर शेतकऱ्यांना हा प्रकार समजला आहे.
एवढेच नाही तर शेतकऱ्यांच्या नावाने ठिबक संच खरेदीसह लाखो रुपयांची बोगस पीक कर्ज देखील काढले आहेत. त्यामुळे नियमित कर्जदार असलेले शेतकरी देखील आता थकबाकीदार झाले आहेत. शेतकऱ्यांना यामुळे कोणत्याही बँक पीककर्ज देईन अशी झाली आहे.
त्यामुळे शेतकरी चोहोबाजूने घेरला जाऊन आर्थिक संकटात सापडला आहे. संबंधित बँक अधिकारी व त्यांना साथ देणाऱ्या सर्वांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असून कारवाई न झाल्यास बँकेच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.
Share your comments