मुंबई: कर्करोगाच्या आव्हानाचा सक्षमपणे मुकाबला करण्यासाठी सर्व संबंधितांनी विशेष योजना तयार करावी, अशी सूचना राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केली. कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन या कर्करुग्णांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते भारतीय पोस्टाचे एक विशेष आवरण जारी करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
देशात मृत्यूला कारणीभूत असलेल्या प्रमुख कारणांमध्ये कर्करोगाचा दुसरा क्रमांक लागतो. गेल्या तीन दशकांमध्ये कर्करोगाचे प्रमाण दुपटीने वाढले आहे आणि ते सातत्याने वाढत आहे. शासकीय संस्था, खासगी संस्था तसेच अशासकीय संस्थांनी एकत्रितपणे काम करून कर्करोगाचे निदान करण्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा सामान्य लोकांना परवडेल अशा किंमतीत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
पुरुषांमध्ये तोंडाच्या कर्करोगाचे तर स्त्रियांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. राज्यातील ग्रामीण भागांमध्ये, विशेषतः गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात गुटखा खाण्याचे प्रमाण लहान मुलांमध्येदेखील वाढले असल्याचे नमूद करून तंबाखूचे सेवन कमी करण्यासाठी नव्याने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे राज्यपालांनी सांगितले. यावेळी राज्यपालांनी संस्थेला कर्करुग्ण सेवाकार्यासाठी एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली.
कार्यक्रमाला कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनचे अध्यक्ष वाय.के. सप्रू, मुंबई विभागाच्या प्रधान पोस्ट मास्टर स्वाती पांडे तसेच उभय संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
Share your comments