1. बातम्या

औरंगाबाद जिल्ह्यात उभा राहणार मका प्रक्रिया उद्योग; शेतकऱ्यांना होणार फायदा


मुंबई :  राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी मराठावाड्यातील मका उत्पादकांना एक चांगली बातमी दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात मका पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे दोन पैसे जास्त मिळावे यासाठी शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योगाबाबत प्रकल्प अहवाल तातडीने तयार करा, असे निर्देश कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात मका प्रक्रिया केंद्र सुरू करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस महसूल राज्यमंत्री अब्दूल सत्तार उपस्थित होते. यावेळी कृषीमंत्री  म्हणाले की,  प्रक्रिया उद्योगात मक्याला मोठी मागणी आहे. मक्याचा औद्योगिक प्रक्रियेमध्ये वापर वाढत आहे. मक्यापासून स्टार्च, पॉपकॉर्न, पोहे, तेल, भरड आणि ग्लुटेन यासारख्या पदार्थांची निर्मिती केली जाते.

मका, कापूस या पिकांपासून अनेक  उप-उत्पादने  बनवली जातात. प्रक्रिया उद्योगात नवीन तंत्रज्ञानचा वापर होत आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी व बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन या योजनातून तसेच गटशेतीच्या माध्यमातून अनेक छोटे प्रकल्प उभे करता येतात. ग्रेडिंग, पॅकिंग, साठवणूक यासारख्या लहान प्रकल्पांबाबत अहवाल तयार करावा. विकेल ते पिकेल या  संकल्पनेतून आपल्याला काम करायचे आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कृषी पर्यटनाच्या योजना आणता येतील. कापूस उत्पादकता वाढीबाबतही विविध कार्यक्रम राबवावे लागतील असेही भुसे यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित असलेले महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, महाराष्ट्रात मका पीक उत्पादन सिल्लोड तालुक्यात मोठ्या प्रमाणात होते. हेक्टरी ६० ते ६५  क्विंटल मका पिकाची उत्पादकता आहे. त्यामुळे येथे मका प्रक्रिया उद्योग उभारणे गरजेचे आहे. कापसाचे उत्पादनही या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे या तालुक्यात सूतगिरणी, टेक्स्टाईल पार्क उभारण्याबाबत विचार व्हावा. शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव तसेच बाजारपेठ मिळाली पाहिजे. तसेच पीक साठविण्यासाठी जागा पाहिजे, तरच शेतकऱ्यांना उत्पादनाचा फायदा मिळतो. मिरचीचे उत्पादनही सिल्लोड तालुक्यात मोठ्या प्रमाणात होते त्यासाठी कोल्ड स्टोरेजची आवश्यकता असल्याचे  सत्तार यांनी सांगितले. या बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters