वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील भारतीय मृद विज्ञान संस्था शाखा परभणी व महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग यांच्या वतीने दिनांक 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन आमदार तथा विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य मा. डॉ. राहुल पाटील हे उपस्थित होते. व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील, प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले, प्राचार्य डॉ. यू. एन. खोडके, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. बी. आर. शिंदे, विभाग प्रमुख डॉ. सय्यद इस्माईल, श्री एस. एच. पवार, श्री. सागर खटकाळे आदीची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण म्हणाले की, दिवसेंदिवस शेतीसाठी उपयुक्त सुपीक माती प्रदुषीत होत आहे. इमारत बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या विटांकरिता सुपीक माती वापर वाढत असुन शहरीकरणामुळे वाढलेले कचऱ्याचे प्रमाण यामुळे सुपीक मातीचा हास होत आहे, हे थांबविण्याची प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. शेतक-यांनी जमिनीतील अन्नद्रव्यांचा उपसा व पुरवठा या मधील तुट कमी करण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला त्यांनी दिला.
आमदार मा डॉ. राहुल पाटील यांनी शाश्वत शेतीकरिता जमिनीचे आरोग्य जपण्याची गरज असुनशेतीत विविध कृषी निवीष्ठांचा काटेकोर वापर आवश्यक असल्याचे सांगितले. कृषी विद्यापीठातील प्रयोगशाळा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या झाल्या पाहिजे तसेच विद्यापीठात दुष्काळ परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी उपयुक्त संशोधन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, माणसाचे आरोग्य मातीशी जुडलेले असुन जमिनीचे आरोग्य बिघडलेले आहे व त्यामुळे माणसाच्या आरोग्य विषयक प्रश्न निर्माण होत आहेत. संतुलीत पीक पोषण मनुष्याच्या समतोल आहारासाठी गरजेचे आहे. भावी पिढीच्या चांगल्या आरोग्यासाठी माती परिक्षणाच्या अहवालानुसार रासायनिक खतांचा समतोल वापर करावा, असे मत त्यांनी दिला.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. बी. आर. शिंदे यांनी उत्पादन वाढीसाठी माती परिक्षण गरजेचे असल्याचे सांगितले तर श्री. एस. एच. पवार यांनी जमीन आरोग्य पत्रिका वितरण अभियाणाबाबत माहिती दिली. कार्यक्रमात कृषी विभाग व मृद विज्ञान संस्थेच्या वतीने 25 शेतकयांना त्यांच्या शेतातील मातीचे परिक्षण करुन आरोग्य पत्रिकेचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते विविध घडीपत्रीकांचे विमोचन करण्यात आले.
प्रास्ताविकात विभाग प्रमुख डॉ. सय्यद इस्माईल यांनी कोरडवाहु शेतीत पिक उत्पादनात शाश्वतता आणण्यासाठी सेंद्रीय खते व हिरवळीच्या खंताच्या वापर करण्याची गरज असल्याचे सांगितले. सुत्रसंचालन डॉ. स्वाती झाडे यांनी केले तर आभार डॉ. सुरेश वाईकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. अनिल धमक, डॉ. पपीता गौरखेडे, डॉ. रामप्रासद खंदारे, प्रा. अनिल मोरे, डॉ. अडकीणे, श्रीमती महावलकर, श्री. अजय चरकपल्ली आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमास शेतकरी, विद्यापीठातील व कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्यने उपस्थित होते.
Share your comments