कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सध्या देशात लॉकडाऊन सुरू आहे. राज्यातील फळे भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी राज्यातील ३०७ बाजार समित्यांपैकी २२० समित्यांमधून कामकाज सुरू आहे. कमी गर्दीत बाजार सुरू ठेवण्याचे व्यवस्थापन केल्याची माहिती पणन संचालक पवार यांनी एका वृत्तसंस्थेला दिली आहे. राज्यातील फळे भाजीपाल्याची विस्कळीत झालेला पुरवठा पुर्ववत होत आहे. यासाठी पणन, कृषी आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने काम सुरु झाले आहे.
बाजार समित्यांमध्ये तसेच थेट पणनद्वारे भाजीपाला पुरवठा सुरळीत झाला आहे. यासाठी पुणे, नाशिक आणि मुंबई महानगरपालिकांनी देखील पुढाकार घेतला आहे. शहरांमध्ये विविध ठिकाणी भाजीपाला विक्री केंद्र शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गटाद्वारे सुरु केला आहे. शहरांमधील पुरवठा साखळी पुर्ववत चालू झाली असून ग्राहकांनी फळे भाजीपाला किराणा मिळणार नाही अशी भिती बाळगू नये आणि या वस्तूंचा साठ करु नये, असेही पवार यांनी सांगितले. औरंगाबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समिती जाधववाडी येथे भाजीपाला व फळे यांची आवक मोठ्य़ा प्रमाणात होते. बाजारात मोठी गर्दी होत असल्याने तेथील जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, महानगरपालिका यांनी एकत्र येऊन शेतकरी गटांमार्फत थेट ग्राहकांना भाजीपाला व फळे पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
Share your comments