1. बातम्या

महाराष्ट्राला विविध 11 राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान

KJ Staff
KJ Staff


नवी दिल्ली:
महाराष्ट्राने संपूर्ण राज्यात 170 पुलवजा बंधारे बांधण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला असून या कामांमुळे महाराष्ट्राचे दुष्काळी चित्र पालटणार आहे, असा विश्वास केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी आज राष्ट्रीय जल पुरस्कार वितरण समारंभात व्यक्त केला. जलयुक्त शिवार योजनेतून जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्राला पहिला राष्ट्रीय जल पुरस्कार श्री. गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन, जलसंधारणमंत्री प्राराम  शिंदेकामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारलाकेंद्रीय जलसंपदा, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय जल पुरस्कार वितरण समारंभात श्री. गडकरी बोलत होते. या कार्यक्रमास  केंद्रीय जलसंपदा राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, केंद्रीय जलसंसाधन सचिव यू.पी. सिंह उपस्थित होते.

यावेळी श्री. गडकरी म्हणाले, पाण्याचा अचूक वापर व योग्य नियोजन महत्त्वाचे बनले असून पाण्याच्या नियोजनवरच देशाचा विकास अवलंबून आहे. जलसंधारण क्षेत्रात जनजागृती करण्याच्या उद्देशाने जल पुरस्काराची सुरवात करण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये जलसंधारण क्षेत्रात विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. राज्य शासनाने नुकतेच 170 पुलवजा बंधारे बांधण्याचा कार्यक्रम हाती घेतला असून यामुळे महाराष्ट्राचे चित्र पालटणार आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून केलेल्या कामामुळे या भागात पाण्याचे साठे निर्माण झाले आहेत. राज्य सरकारने तयार केलेली बळीराजा योजना शेतकऱ्यांच्या हिताची ठरत आहे असेही श्री. गडकरी यावेळी म्हणाले.  

महाराष्ट्राला 11 राष्ट्रीय जल पुरस्कार

देशपातळीवरील पहिल्या राष्ट्रीय जल पुरस्कारासह महाराष्ट्राला विविध श्रेणींमध्ये 10 पुरस्कार आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यामध्ये अहमदनगर, लातूर, बीड, वर्धा या जिल्ह्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. 

भूजल पुनरुज्जीवनात अहमदनगर देशात सर्वोत्कृष्ट जिल्हा

जलयुक्त शिवार योजना व राज्य शासनाच्या जलसंधारण विषयक विविध कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीतून अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या भूजल पुनरुज्जीवनाच्या कामाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील महूद ग्रामपंचायत ठरली सर्वोत्तम

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील महूद ग्रामपंचायतीने केलेल्या जलसंधारणाच्या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. महूद ग्रामपंचायत देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत ठरली असून ग्रामपंचायत अंतर्गत ओढा खोलीकरण,पाझर तलावातील गाढ काढून केलेले पुनरुज्जीवन, विहिर पुनर्भरण, वनराई बंधारे आदी कामे जनसहभागातून व राज्याच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेतून पार पडली. याच कामाची पावती म्हणून ग्रामपंचायतीला जलसंधारण क्षेत्रातील कामासाठी सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्रदान करण्यात आला. सरपंच बाळासाहेब ढाळे आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण देशात अव्वल

राज्यात जलसंधारण विषयक विविध कार्यक्रमांचे प्रभावी नियमन करणारे राज्य शासनाचे पुणे स्थित महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण देशात सर्वोत्तम ठरले आहे. प्राधिकरणाला उल्लेखनीय कामासाठी आज सर्वोत्तम पुरस्काराने गौरविण्यात आले. 

सह्याद्री वाहिनीचा जनता दरबार ठरला सर्वोत्तम टीव्ही शो

जलसंधारण क्षेत्राविषयी जनजागृती व शासनाच्या जलसंधारण विषयक योजनांची प्रभावी माहिती देणारा टिव्ही शो म्हणून दूरदर्शन सह्याद्री जनता दरबार हा विशेष कार्यक्रम देशात सर्वोत्तम ठरला.

महासिंचन विकास पत्रिका आणि लोकमत ठरले सर्वोत्तम प्रादेशिक माध्यम

जलसिंचन व जलसंधारण विषयक जनजागृतीसाठी प्रसार माध्यमांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक अशा तीन श्रेणीमध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रादेशिक श्रेणीत दोन्ही पुरस्कारांवर महाराष्ट्रातील प्रसार माध्यमांनी मुद्रा उमटवली. पुणे येथील महासिंचन विकास पत्रिकेला प्रथम पुरस्काराने तर दैनिक लोकमतला द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दैनिक लोकमतचे समूह संपादक विजय बावस्कर यांनी पुरस्कार स्वीकारला.  

लातूर येथील शासकीय निवासी शाळेचा सन्मान

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील जाऊ येथील अनुसूचित जाती नवबौद्ध मुलींची निवासी शासकीय शाळेच्या जलसंधारण विषयक कामाची दखल राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी घेण्यात आली. शाळेच्या विद्यार्थिनी व शिक्षकांनी श्रमदानातून केलेल्या जलसंधारण विषयक कामामुळे भूजल स्तर वाढण्यात मोलाची मदत झाली. शाळेच्या या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन शालेय श्रेणीत द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हयाचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत आणि शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय मुखम यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters