नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे यंदाच्या नैपुण्य पारीतोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. यात महाराष्ट्राने एकुण 19 पारितोषिकांपैकी 9 पारितोषिके पटकावून देशभरात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश 4 पारितोषिके, हरियाणा 3 पारितोषिके यांचा दुसरा व तिसरा क्रमांक लागला असून गुजरात, तमिळनाडू व मध्यप्रदेश प्रत्येकी एक अशी क्रमवारी आहे.
दरवर्षी राष्ट्रीय सहकारी साखर महासंघातर्फे देशभरातील सहकारी साखर कारखान्यांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यात येते व ते केंद्रशासनाच्या मुख्य साखर प्रबंधक यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञांच्या समितीसमोर मंजूरीसाठी ठेवण्यात येते. या समितीमध्ये एन्.सी.डी.सी. चे मुख्य प्रबंधक, नॅशनल शुगर इन्स्टीट्यूटचे संचालक, वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटचे महासंचालक तसेच उत्तरप्रदेश, हरियाणा, पंजाब, गुजरात व महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे कार्यकारी संचालक यांचा समावेश असतो.
या समितीसमोर देशभरातुन एकुण 83 सहकारी साखर कारखान्यांनी त्यांच्या तांत्रिक प्रक्रिया वित्तीय, ऊस उत्पादकता व एकुण व्यवस्थापन या बाबींची माहिती व आकडेवारी सादर करण्यात जास्तीत जास्त कारखान्यांचा पारितोषकांसाठी विचार होण्याचे दृष्टीने उच्च साखर उतारा व उर्वरीत अशा दोन भागात पारितोषिकांची विभागणी करण्यात येते.
देशातील सर्वोत्तम सहकारी साखर कारखाना (कै. डॉ. वसंतदादा पाटील पारितोषिक) भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, पारगाव ता. आंबेगाव, जि. पुणे देशातील सर्वोत्तम सहकारी साखर कारखान्याची निवड करण्याचे निकष : एकुण गुणांकातील ऊस उत्पादकता व तांत्रिक नैपुण्यासाठीचे प्रत्येकी 30 टक्के व वित्तीय व्यवस्थापनासाठीचे 40 टक्के गुण अशी विभागणी करुन मुल्यमापन करण्यात येते. या सर्वच विभागात देश पातळीवर सर्वाधिक गुणांक प्राप्त करणार्या कारखाण्याची या प्रतिष्ठीत पारितोषिकांसाठी तज्ञांच्या समितीतर्फे एकमताने निवड करण्यात येते. |
यंदाचे विभागनिहाय पारितोषिक विजेते खालील प्रमाणे आहेत.
उस उत्पादकता पारितोषिक :
- उच्च उतारा विभाग :
प्रथम क्रमांक : क्रांती अग्रणी डॉ. जी.डी.बापू लाडसहकारी साखर कारखाना, जि.सांगली.
द्वितीय क्रमांक : पद्मश्री क्रांतीवीर डॉ. नागनाथआण्णा नायकवाडी हुतात्मा स.सा.का, जि. सांगली.
- इतर विभाग :
प्रथम क्रमांक : कर्नाल सहकारी साखर कारखाना, हरियाणा
द्वितीय क्रमांक : गंगा किसन सहकारी चिनी मिल, मोर्णा, उत्तर प्रदेश
तांत्रिक नैपुण्य विभाग :
- उच्च उतारा विभाग
प्रथम क्रमांक : श्री. विघ्नहर स.सा.का. जुन्नर. जि. पुणे
द्वितीय क्रमांक : श्री. पांडुरंग स.सा.का. श्रीपूर, जि. सोलापूर
- इतर विभाग :
प्रथम क्रमांक : शहाबाद सहकारी साखर कारखाना, हरियाणा.
द्वितीय क्रमांक : हाफेड शुगर मिल, कर्नाल, हरियाणा.
वित्तीय व्यवस्थापन विभाग :
- उच्च उतारा विभाग
प्रथम क्रमांक : सह्याद्री स. सा. का, कराड, सातारा
द्वितीय क्रमांक : श्री. नर्मदा खांड उद्योग सहकारी मंडळी, जि. नर्मदा, गुजरात
- इतर विभाग :
प्रथम क्रमांक : कल्लाकुर्ची सहकारी साखर कारखाना, तमिळनाडू.
द्वितीय क्रमांक : नवलसिंग स. सा. का. बुर्हाणपूर, मध्यप्रदेश.
उच्चांकी ऊस गाळप विभाग :
- उच्च उतारा विभाग :
प्रथम क्रमांक : विठ्ठलराव शिंदे स. सा. का. माढा, जि. सोलापूर
- इतर विभाग :
प्रथम क्रमांक : सरजू सहकारी चीनी मिल, बलरायन, उत्तर प्रदेश
उच्चांकी साखर उतारा विभाग :
- उच्च उतारा विभाग :
प्रथम क्रमांक : कुंभी कासारी स. सा. का. जि. कोल्हापूर
- इतर विभाग :
प्रथम क्रमांक : किसान सहकारी चीनी मिल. गजरौला, उत्तर प्रदेश
सर्वोत्तम सहकारी साखर कारखाना :
- उच्च उतारा विभाग :
प्रथम क्रमांक : सोनहीरा स. सा. का. वांगी, जि. सांगली
- इतर विभाग :
प्रथम क्रमांक : किसान सहकारी चीनी मिल. नजिबाबाद, उत्तर प्रदेश
राष्ट्रीय स्तरावरील ही पारितोषिके मिळवण्यासाठी देशभरातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये सशक्त स्पर्धा होत असते. व त्यातूनच दरवर्षी नव्या पारितोषिक विजेत्या कारखान्यांची भर पडत असते.
यंदाचा पारितोषिक वितरण सोहळा नवी दिल्ली येथे सोमवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी होणार आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान माजी कृषीमंत्री खा. शरद पवार भुषविणार असून केंद्रिय मंत्री ना. नितीन गडकरी, ना. रामविलास पासवान व ना. चौधरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे असे राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रकाश नाईकनवरे यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले.
Share your comments